दुकानाला भगदाड पाडून 31 लाखांचा ऐवज लंपास

 Malad
दुकानाला भगदाड पाडून 31 लाखांचा ऐवज लंपास
Malad, Mumbai  -  

मुंबईच्या दिंडोशी परिसरात आंबे विक्रेत्यांनी शेजारी असलेल्या सोनाराच्या दुकानाला भगदाड पाडून 31 लाख 27 हजारांचा ऐवज लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 1 किलो सोने, चांदी आणि 50 हजारांची रोकड असे मिळून सुमारे 31 लाख 27 हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. रविवारी रात्री 10 च्या सुमारास खातेवाडी येथील सत्यम ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला असून, तेव्हापासून हे आंब्याचे व्यापारी फरार आहेत.

मालाड येथील राणी सती रोड, खातेवाडी चौक येथे सत्यम ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून मालक अमृतलाल जैन घरी गेले. सोमवारी सकाळी जेव्हा त्यांनी दुकान उघडले तेव्हा त्यांच्या पायाखालची जामीनच सरकली. दुकानाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले होते आणि दुकानाची तिजोरी गॅस कटरने कापून आतील तब्बल 31 लाखांचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते.या भिंतीला हे भगदाड शेजारील आंब्याच्या दुकानातून पाडण्यात आले होते. आंब्याचे हे व्यापारी जवळपास दोन महिन्यांपासून इथे धंदा करत असून, घडफोडी केल्यानंतर ही मंडळी पसार झाली.या प्रकरणी आम्ही गुन्हा नोंदवला असून, लवकरच आरोपींना पकडले जाईल, असा विश्वास दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून 2 गॅस सिलिंडर आणि 1 गॅस कटर हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे दुकानामधील सीसीटीव्ही खराब झाल्याने ते दुरुस्तीसाठी गेल्याची माहिती या आंबे विक्रेत्यांना होती. याचाच फायदा घेत त्यांनी चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.

Loading Comments