शाहरुख खानचा (Shah rukh khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan khan)जामीन प्रक्रियेत अभिनेत्री जुही चावलानं (Juhi Chawla) महत्वाची भूमिका निभावली आहे.
आता तुम्ही म्हणाल आता यात जुही चावलाचा काय संबंध? पण झालं असं की, आर्यनच्या जामिनासाठी जुही चावला जामिनदार झाली.
आर्यन खानच्या जामिनानंतर काही कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करायच्या होत्या. यासाठी जुही चावला मुंबई सत्र न्यायालयात आली होती. आर्यनच्या जामिनासाठी जुही चावला जामिनदार आहे.
ज्या अटी शर्थी न्यायालयानं घातल्या आहेत, त्या अटीनुसार आर्यनला जामिनदाराची गरज भासणार होती. त्यासाठी जुही चावला न्यायालयात पोहचली होती. १ लाखाच्या जामीनाच्या करारनाम्यावर जुही चावलानं सही केली.
जुही चावला शाहरुख खानची जवळची मैत्रिण आहे. सोबतच तिनं शाहरुखसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले, "ती (जुही चावला) त्याला जन्मापासून ओळखते. व्यावसायिकरित्या देखिील त्यांचे संबंध आहेत."
आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह (PR Bond) १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं २९ ऑक्टोबरला याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं.
गुरुवारी २८ ऑक्टोबरला न्यायालयानं जामीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आता आज आर्यन खानसह तिघेही तुरूंगाच्या बाहेर आले.
जामीन देताना न्यायालयानं घातल्या ‘या’ अटी
- प्रत्येक आरोपीला एक किंवा अधिक जामीनदारासह १ लाख रुपयांचा पी. आर. बँड द्यावा लागेल.
- आरोपींनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार जे गुन्हे दाखल आहेत. त्या किंवा तशा इतर कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होऊ नये.
- आरोपींनी या गुन्ह्यातील सहआरोपी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये.
- आरोपींनी एनडीपीएस विशेष न्यायालयासमोर सुनावणी सुरू असलेल्या कोणत्याही गोष्टीत बाधा येईल अशा कृती करू नये.
- आरोपीने स्वतः किंवा इतर कुणाच्या माध्यमातून साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करू नये.
- आरोपींनी तात्काळ आपले पासपोर्ट विशेष न्यायालयाकडे जमा करावेत.
- आरोपींनी विशेष न्यायालयासमोर सुरू असलेल्या प्रकरणावर कोणत्याही प्रकारच्या माध्यमांसमोर वक्तव्य करू नये.
- विशेष न्यायालयाकडून परवानगी घेतल्याशिवाय आरोपींनी देश सोडून कुठेही जाऊ नये.
- आरोपींना मुंबई बाहेर कुठेही जायचे असेल तर त्यांना तपास अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी लागेल. तसेच तपास अधिकाऱ्यांना आपल्या प्रवासाचे सर्व तपशील द्यावे लागतील.
- आरोपींना प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजर रहावे लागेल.
- आरोपींना न्यायालयातील प्रत्येक तारखेला हजर रहावे लागेल. याला केवळ विशेष परिस्थितीत अपवाद असेल.
- आरोपींना एनसीबी तपासासाठी जेव्हा जेव्हा बोलावेल तेव्हा चौकशीसाठी हजर रहावे लागेल.
- खटला सुरू झाल्यानंतर आरोपीने ही सुनावणी प्रलंबित होईल किंवा उशीर लागेल असं काहीही करू नये.
- आरोपीने यापैकी कोणत्याही अटीचा भंग केल्यास एनसीबीला विशेष न्यायालयात जामीन रद्द करण्याचा अधिकार असेल.
हेही वाचा