न्यायासाठी पाहावी लागली मृत्यूची वाट


न्यायासाठी पाहावी लागली मृत्यूची वाट
SHARES

मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक जण हेच स्वप्न उराशी बाळगून अापल्या संसाराचा रेटा अोढत असतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींच्या पदरी मात्र तडजोडच येते. असंच काहीसं स्वप्न वांद्रे इथं राहणाऱ्या एका वृद्धेनं बाळगलं. अापलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. घर खरेदीसाठी जमवलेले सर्व पैसे अापल्या अोळखीच्या व्यक्तींकडे दिले. मात्र घराच्या चाव्या मिळण्याएेवजी फसवणुकीचं दान त्यांच्या पदरात पडलं. अखेर न्याय मिळवण्यासाठी तिला मृत्यूचीच वाट पाहावी लागली.


१५ लाखांची झाली फसवणूक

वांद्रेच्या खेरवाडी परिसरात ५८ वर्षीय कमल जाधव ही वृद्ध महिला अापल्या दोन मुलांसोबत राहत होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्यानं कमल दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणीभांडी करून अापला उदरनिर्वाह करत होती. मात्र त्याबरोबरच मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्नंही त्यांनी पाहिली होती. मुंबईत अापल्या मुलांसाठी हक्काचं घर असावं, यासाठी कमल अापल्या मिळकतीतून काही रुपये बाजूला काढून साठवत होती. २०१५ मध्ये कमल यांनी १४ लाख ७० हजार रुपयांची पुंजी जमा केली होती. मात्र या पैशात मुंबईत झोपडपट्टीतही खोली मिळत नव्हती.


शेजाऱ्यांनीच केली फसवणूक

मुंबईत घर घेण्याची अापली इच्छा कमल यांनी शेजारी राहणाऱ्या जया गोरीवले यांच्याकडे बोलून दाखवली होती. त्यावेळी जयाने वांद्रेच्या अांबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या चंद्रकांत कदम यांच्या अोळखीने स्वस्तात घर घेण्याचं अामीष कमल यांना दाखवलं. त्यानुसार व्यवहारही पार पडला. मात्र त्यानंतर कित्येक महिने उलटून गेले तरी घराचा ताबा मात्र मिळत नव्हता. याचदरम्यान कमल यांची प्रकृती खालावली. त्यानंतर जया आणि चंद्रकांत यांनी कमल यांना घराची बनावट कागदपत्रे सादर करून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र जया आणि चंद्रकांत हे आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर कमल यांनी खेरवाडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली.


न्याय मिळण्याएेवजी मृत्यूनेच त्यांना गाठले

दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवून वर्ष उलटले. पोलिसांकडून दोन्ही आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी कमल जवळपास वर्षभर पोलिस ठाण्याच्या चकरा मारत होत्या. दरम्यान आठ दिवसांपूर्वी पोलिसांनी याप्रकरणी जया आणि चंद्रकांत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवून आठ दिवस होत नाहीत तोच कमल यांचे गंभीर आजाराने निधन झाले. या गुन्ह्यात खेरवाडी पोलिसांनी अाता दोन्ही आरोपींना अटक केली असून अधिक तपास पोलिस करत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा