कमला मिल आग: २ महिन्यांनी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

कमला मिल आग प्रकरणात दोन महिन्यानंतर ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी आरोपींविरोधात २ हजार ७०६ पानांचं आरोपपत्र भोईवाडा दंडाधिकारी न्यायालयात सादर केलं आहे.

कमला मिल आग: २ महिन्यांनी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
SHARES

कमला मिल कंपाऊंड आगीप्रकरणी दोषी आरोपींविरोधात ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी बुधवारी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण १२ जणांना अटक केली होती. त्यात वन अबोव्ह, माेजोस बिस्ट्रो रेस्टोपबचे मालक आणि कमला मिलच्या सहमालकाचा देखील समावेश आहे.

तर, याप्रकरणी एक महापालिका अधिकारी आणि एका अग्निशमन अधिकाऱ्यालाही अटक झाल्याची माहिती मिळत आहे.

२७ डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला आग लागली. ही आग भडकत जाऊन तिने शेजारीच असलेल्या वन अबोव्ह पबला आपल्या कवेत घेतलं. या भीषण आगीत एकूण १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १२ जण जखमी झाले होते.


किती पानांचं आरोपपत्र?

त्यानंतर या दोन्ही पब मालकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करत पोलिसांनी १२ दोषींना आतापर्यंत अटक केली होती. त्यात वन अबोव्ह रेस्टोपबचे तीन मालक कृपेश सिंघवी, जिगर सिंघवी, अभिजीत मानकर, मोजोस बिस्टोचा मालक युग पाठक, कमला मिलचा मालक रमेश गोवानी, सहमालक रवी भंडारी, स्थानिक अग्निशमन केंद्राचे अधिकारी राजेंद्र पाटील, हुक्का पुरवठादार उत्कर्ष विनोद यांचा समावेश होता. त्यानंतर  दोन महिन्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात २ हजार ७०६ पानांचं आरोपपत्र भोईवाडा दंडाधिकारी न्यायालयात सादर केलं आहे.


तत्कालीन सरकारवर खापर

या आगीनंतर जाग आलेल्या मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र प्रकरण शांत झाल्यानंतर परिस्थीती 'पुन्हा जैसे थे' झाली. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आगीचं खापर तत्कालीन सरकारवर फोडलं. एवढंच नव्हे, तर मिलच्या जमिनीचं वाटप करताना नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.


हेही वाचा-

कमला मिल आगीला तत्कालीन सरकारच जबाबदार- मुख्यमंत्री

कमला मिलचा पार्टनर रमेश गोवानीला २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा