म्हाडात बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा, दलाल तपस चॅटर्जीला अटक


म्हाडात बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा, दलाल तपस चॅटर्जीला अटक
SHARES

बोगस कागदपत्रांद्वारे म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घरे लाटून ती विकण्याच्या बहाण्याने सर्वसामान्यांची फसवणूक करणारा दलाल जावेद पटेलला १० दिवसांपूर्वी खेरवाडी पोलिसांनी अटक केली. त्यापाठोपाठ आता खेरवाडी पोलिसांनी बोगस जात प्रमाणपत्राद्वारे म्हाडाच्या लाॅटरीतील घरे लाटणारा दलाल तपस चटर्जीला रविवारी अटक केल्याची माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. 

दलाल जावेद पटेलच्या अटकेने म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घरांचा घोटाळा उघड झाला आहे. तर चॅटर्जीच्या अटकेने बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्याची चर्चा आहे.

म्हाडाच्या लाॅटरीतील आरक्षित गटातील (एसटी, एनटी, टीडी आणि एससी) विजेत्यांना घराचा ताबा घेण्यासाठी म्हाडाकडे जात प्रमाणपत्र सादर करावे लागते. या जात प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतरच विजेत्याला घरासाठी पात्र ठरवत घराचा ताबा दिला जातो. असे असताना अनेक विजेत्यांकडे वा प्रतिक्षा यादीतील विजेत्यांकडे जात  प्रमाणपत्र नसते. त्यामुळे अशा विजेत्यांना म्हाडाला घर परत करावे लागते.

हाच धागा पकडत चॅटर्जी ज्या विजेत्यांकडे जात प्रमाणपत्र नाही त्यांना गाठून त्यांना बोगस प्रमाणपत्र तयार करून द्यायचा. ही बाब २०१२-२०१३ मध्ये उघडकीस आल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने आतापर्यंत आरक्षित गटातील ताब दिलेल्या फाईल्सची पुनर्तपासणी केली. यातून दलालांनी मोठ्या संख्येने बोगस जात प्रमाणपत्राद्वारे घरे लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार मुंबई मंडळाने खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार-गुन्हे दाखल केले.


अशी लाटली जातात घरे

२०१५ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याअंतर्गत रविवारी दलाल तपस चॅटर्जीला अटक केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. चॅटर्जी लाॅटरीतील विजेत्यांची, प्रतिक्षा यादीवरील विजेत्यांची यादी म्हाडा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने मिळवायचा. त्यानंतर अडचणीत असलेल्या विजेत्यांना त्यांच्या घरी जाऊन गाठायचा आणि त्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करायचा. अशाप्रकारे चॅटर्जीने अनेक घरे लाटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

म्हाडाच्या तक्रारीनुसार या प्रकरणाचा तपास केल्यानंतर चॅटर्जीचे नाव समोर आल्याने रविवारी पोलिसांनी त्याला मालाडमधील घरातून अटक केली. चॅटर्जीला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून यातून बोगस जात प्रमाणपत्राद्वारे घरे लाटणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. तर दलालांना मदत करणाऱ्या भ्रष्ट म्हाडा अधिकाऱ्यांचीही नावे उजेडात येण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

तुरूंगातील बिल्डरला महारेराचा दणका, आठवड्याभरात घराची नोंदणी करून घेण्याचे आदेश

..तर प्रकल्पासाठी रेरा नोंदणीची गरज नाही!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा