बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण

बंदुकीचा धाक दाखवून नावीवाला यांचे अपहरण करण्यात आले. गुजरातमध्ये गाडीतून नेत असताना त्यांच्याकडून 16 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली.

बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण
SHARES

सूरतमधील व्यावसायिकाचे मुंबईतून अपहरण करून १६ लाखांची खंडणी उकळणा-या तोतया आयपीएस अधिका-याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. शीवशंकर शर्मा(३८) असे अटक आरोपीचे नाव असून राजस्थानमधील अजमेर येथील रहिवासी आहे. महसूल गुप्तवार्ता संचलनालयामध्ये(डीआरआय) तक्रार असल्याचे सांगून दक्षिण मुंबईतील  हॉटेलमधून बंदुकीच्या धाकावर या व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी गुजरात ते बंगळूरू आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक केली. आरोपी अशा फसवणूकीच्या पैशातून उच्च्भ्रू जीवन  जगत होता.

हेही वाचाः- आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

 कापड निर्यातदार असलेल्या गुजरातमधील व्यावसायिक मोहम्मद इस्तेशाम अस्लाम नावीवाला यांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली. सीमाशुल्क बुडवल्याप्रकरणी नावीवाला यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्याचा दूरध्वनी शर्मा याने केला होता. स्वतःला वरिष्ठ आयपीएस अधिकार म्हणवणा-या शर्माने सर्व प्रकरण मिटवण्यासाठी मरिन ड्राईव्ह येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. अधिक पैशांची मागणी केल्यामुळेही बोलणी फिस्कटली. त्यावेळी शर्मा व त्याच्या साथीदारासोबत नावीवाला याची बाचाबाची झाली. त्यावेळी आरोपींनी नावीवाला याला मारहाण केली व हॉटेलरूममध्ये कोंडून ठेवले. तसेच बाहेर जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून नावीवाला यांचे अपहरण करण्यात आले. गुजरातमध्ये गाडीतून नेत असताना त्यांच्याकडून १६लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली.

हेही वाचाः- मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणार लोकल?

नावीवाला यांनी सर्वप्रथम  गुजरात पोलिसांकडे तक्रार केली. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात नकार दिला. त्यानंतर नावीवाला यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याप्रकरणी प्राथमिक पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकही याप्रकरणी तपास करत होते. त्यावेळी आरोपी गुजरातमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी त्याला अटक करण्यासाठी पोलिस पथक गुजरातला रवाना झाले. पण आरोपीला संशय आल्यामुळे तो सारखे त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. त्यानंतर गुजरातपर्यंत २४ तासांहून अधिक कालावधी आरोपीला पाठलाग केल्यानतंर त्याला पकडून मुंबईत आणण्यात आले. येथे त्याला अटक करण्यात आली. नावीवाला याच्याविरोधात खरचं डीआरआयमध्ये गुन्हा दाखल होता. त्याची माहिती शर्मा व त्याच्या साथीदाराला मिळाली. त्यानंतर आरोपींनी नावीवालाची फसवणूक करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपींनी त्याचे अपहरण केले.

हेही वाचाः- नागरिकांना गूगल मॅपवर मिळणार प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती

आरोपी शर्मा सराईत असून यापूर्वीही अशा प्रकारे त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. मध्यप्रदेशातील एका ढाबा मालकाची आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून त्याने फसवणूक केली होती. त्याप्रकरणी त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. याशिवाय गुजरातमधील एका महिला पोलिसाचीही आरोपीने लग्न करण्याच्या नावाखाली फसवणूक केली होती. आरोपीने तिच्याशी लग्नाच्या बहाण्याने लाखोरुपये घेतले व त्यानंतर तिच्यासोबत सर्व संबंध तोडून टाकले होते. फसवणूकीच्या पैशातून आरोपी आलीशान जीवन जगत होता. त्याची स्वतःची महागडी कार असून त्याने आयपीएस अधिका-याचा गणवेशही शिवला आहे. याशिवाय त्याच्याकडे बंदुकही असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपीच्या साथीदाराची ओळख पटली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शर्मा विरोधात भादंवि कलम १७० (तोतयागिरी), ३२३ (मारहाण), ३४२ (अटकाव करणे), ३६४(अ)(खंडणीसाठी अपहरण), ३८६ (मारहाण करून खंडणी उकळणे), ५०४ (शिवीगाळ), ३४(सामायिक इरादा) सह हत्यार बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा