सीसीटीव्हीमध्ये पहा टकटक गँगची चलाखी!

धारावी - एटीएम कॅशव्हॅन लूट प्रकरणी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. ही व्हॅन दुसऱ्या तिसऱ्या कोणी लुटली नसून यामागे मुंबईच्या टक टक गँगचा हात आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण लूट सीसीटीव्हीत कैद झाली असून हे फुटेज 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागले आहे.

धारावीच्या संत रोहिदास मार्गावरील सीसीटीव्ही दृश्यात तुम्हाला एटीएम कॅश व्हॅन स्पष्टपणे दिसून येईल. सुरुवातीला एक इसम व्हॅनच्या जवळ जातो आणि व्हॅनमध्ये पैशांची पेटी आहे की नाही याची खातरजमा करून घेतो. त्याची खात्री होताच यांच्या कारनाम्याला सुरुवात होते. त्यानंतर त्याचाच एक साथीदार येतो आणि चालकाला सांगतो की तुमच्या गाडीच्या बाहेर बऱ्याच नोटा पडल्या आहेत. चालक बाहेर यावा म्हणून तो त्याला व्हॅनचा दरवाजा देखील उघडून देतो. जसा चालक बाहेर येतो आणि पैसे उचलण्यासाठी वाकतो तसे हे चोर पुढे सरसावतात. टोळीतील काही चोर व्हॅनच्या दारात उभे राहून चालकाची नजर चुकवत एटीएम व्हॅनचा दरवाजा उघडतात. पैशाने भरलेला पेटारा घेऊन हे सगळे तिथून पोबारा करतात. यांच्या या कारस्थानापासून अनभिज्ञ असलेला चालक परत गाडीत येऊन बसतो. पण त्याला एवढं देखील समजत नाही की त्याच्या गाडीतून 1 कोटी 56 लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे.

Loading Comments