ढोल-ताशा पथकाच्या प्रमुखाने केली आत्महत्या

दहिसर - संपूर्ण देशात एकीकडे रंगपंचमीचा उत्साह असताना मार्तंड ढोल ताशा पथकाच्या प्रमुखाने आत्महत्या केल्याची घटना दहिसरमध्ये घडली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव स्वप्नील ढोकरे असं असून तो दहिसर (पू.) येथील रावलपाडा, गोकुळनगर इथल्या राठोड चाळीतला राहणारा होता. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

रंगपंचमीच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली. मात्र आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती, अशी माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांनी सांगितलं. मात्र त्यामध्ये त्याने मृत्यूला कोणालाच जबाबदार ठरवलं नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. स्वप्नील हा मार्तंड ढोल ताशा पथकाचा प्रमुख असून तो एक चांगला व्यक्ती असल्याचं तिथल्या आसपासच्या नागरिकांनी सांगितलं. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Loading Comments