SHARE

चारित्र्यावर संशय घेत भांडुपमध्ये २२ वर्षीय तरुणाने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. शिवानी महिरे (१९) असं मृत तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमर उर्फ राहुल महिरे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.


संपूर्ण प्रकार

मूळचा नाशिकचा असलेला अमर हा कामानिमित्त एक वर्षापूर्वी मुंबईत आला होता. मुंबईत अमर हा भांडुपच्या हनुमान टेकडी येथील मस्के चाळीत नातेवाईकांसोबत रहात होता. अमर रहात असलेल्या घराच्या शेजारीच शिवानीचं घर होतं. अमर हा गार्मेंटमध्ये कामाला होता. काही दिवसांपूर्वीत त्याची शिवानीसोबत ओळख झाली होती. कालांतराने दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मात्र याची कुणकुण शिवानीच्या घरातल्यांना लागल्यानंतर त्यांनी तिला अमरपासून लांब राहण्यास सांगितले. त्यामुळे दोघांनी घरातल्यांच्या नकळतच काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. मात्र शिवानीची जबाबदारी पडल्यानंतर अमर कामात व्यस्त असायचा. क्षुल्लक कारणांवरून या दोघांमध्ये खटके उडू लागले होते.


पोलिसांत तक्रार

काही दिवसांपूर्वी अमरला शिवानी कुणा अनोळखी व्यक्तीशी मोबाइलवर बोलत असल्याचा संशय आला. त्यावरून मागील आठवड्याभरापासून दोघांमध्ये वाद होत होते. मात्र तसं काही नसल्याचं शिवानी वेळोवेळी त्याला सांगायची. दरम्यान १ नोव्हेंबर रोजी शिवानीचा मोबाइल अमरने चोरून पाहिल्यानंतर तिच्या मोबाइलमध्ये अनोळखी नंबरहून वारंवार फोन आल्याचे पाहिल्यानंतर त्याला राग अनावर झाला. याच वादातून त्याने शिवानीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

राग अनावर झालेल्या अमरने जवळच पडलेल्या नायलाॅनच्या दोरीने शिवानीचा गळा आवळला. त्याचवेळी शिवानी निश्चिप्त पडल्यानंतर तो घरातून निघून गेला. शेजाऱ्यांनी या हत्येची माहिती भांडुप पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तासांनी अमर स्वतः येऊन पोलिसांसमोर उभा राहिला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यानं तिची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या