धावत्या लोकलमध्ये महिलेला मारहाण, आरोपीला अटक


धावत्या लोकलमध्ये महिलेला मारहाण, आरोपीला अटक
SHARES

डोंबिवली स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं जाण्यासाठी निघालेल्या महिलेला धावत्या ट्रेनमध्ये मारहाण झाल्याची घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या आरोपीचं नाव रफीक खान (३२) असं आहे. हा प्रसंग घडत असताना दुसऱ्याच डब्यात रेल्वे पोलिस (जीआरपी) कर्मचारी तिथं उपस्थित होता. आश्चर्याची बाब म्हणजे डब्यातही काही प्रवासी बसलेले होते. परंतु या महिलेच्या मदतीला यापैकी एकही जण धावून गेला नाही.


नेमकं काय घडलं?

तक्रारदार महिला नाजीया अन्सारी (३०) आणि आरोपी रफीक खान काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात पैशांवरून वाद सुरू होता. या वादातूनच रफीक नाजीयाला त्रास देत होता. त्यानुसार नाजीयाने डोंबिवली स्थानकातून सीएसटीएमकडे जाणारी लोकल पकडताच तिच्या मागावर असलेला रफीक देखील या ट्रेनमध्ये चढला. नाजीया अपंगांच्या डब्यातून प्रवास करत होती. तिच्या मागोमाग रफीक देखील या डब्यात शिरला.




प्रवाशांची बघ्याची भूमिका

ठाणे स्टेशन आल्यावर दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरू झाला. तेव्हा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रफीकने नाजीयाला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी दुसऱ्या डब्यात जीआरपी पोलिस कर्मचारी उपस्थित होता. परंतु मध्ये जाळी असल्याने त्याला दम देण्यापलिकडे काहीच करता येत नव्हतं. शिवाय डब्यात इतरही प्रवासी बसलेले होते, परंतु धावत्या लोकलमध्ये मारहाण होत असलेल्या महिलेला वाचवण्यासाठी एकहीजण पुढे सरसावला नाही. डब्यातील एका प्रवाशाने महिलेला होत असलेली ही मारहाण मोबाइलवर रेकॉर्ड करून दादर जीआरपी पोलिसांना पाठवली.

दरम्यान पुढचं स्थानक येताच जीआरपी कर्मचाऱ्याने रफीकला पकडलं आणि दादर स्थानक येताच पोलिस चौकीत नेलं. आरोपी रफीक शेख वर कलम ३०७, ३५४, ३२३, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



पैशांच्या वादातून मारहाण

आरोपी आणि पीडित महिला हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकाला ओळखत होते. आरोपी रफीकने पीडित नाजीया अन्सारी हिच्याकडून जवळपास १ लाख रुपये घेतले होते. पीडित महिलेने आरोपीकडे दिलेल्या पैशांची मागणी केली असता आरोपीने पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला मारहाण करण्यास सुरूवात केली.


व्हिडिओतील दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या परिचयाचे आहेत. ही लोकल कल्याणहून सीएसटीला येत होती. या प्रकरणी संबधित मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर ३०७ कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
- नितीन बोबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दादर रेल्वे पोलिस ठाणे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा