'मंजुला शेट्येवर लैंगिक अत्याचार झालाच नाही'


'मंजुला शेट्येवर लैंगिक अत्याचार झालाच नाही'
SHARES

भायखळा कारागृहात मृत्यू झालेल्या महिला कैदी मंजुळा शेट्ये हिच्या हत्येनंतर उठलेला वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणी मंजुळाच्या गुप्तांगावर कोणतीही नवीन किंवा जुनी जखम नाही, असा अहवाल मॅजिस्ट्रेटने दिल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले.


एसआयटी होणार स्थापन

या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती रहाटकर यांनी दिली. या समितीत माजी न्यायाधीश, महिला पोलिस अधिकारी आणि एका महिलेचा समावेश असून, ही समिती पोलिस आयुक्तांच्या निदर्शनाखाली काम करणार आहे.


गुप्तांगावर कोणत्याही जखमा नाही?

भायखळा कारागृहातील संपूर्ण अहवाल लवकरात-लवकर देण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे. मंजुळा शेट्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या गुप्तांगावर कोणत्याही जखमा नाहीत असे, तुरुंग प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मंजुळावर लैंगिक अत्याचार झाला आहे की नाही? हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

गुरुवारी महिला आयोगाच्या अध्यक्षांसह तिघांनी गुरुवारी भायखळ्याचे महिला कारागृह गाठून, याप्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. यावेळी महिला आयोगातील सदस्यांनी यातील काही महिला कैद्यांशी देखील संवाद साधला, त्यानंतर या सर्वांच्या मागण्या तसेच मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचा अहवाल त्यांनी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडे मागितला.


स्वाती साठे यांची 40 मिनिटे चौकशी

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणामुळे कारागृहातील महिला कैद्यांची अवस्था तसेच यामागील महाभयंकर घटना उघडकीस आल्यामुळे याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची तब्बल 40 मिनिटे चौकशी केली. या चौकशी दरम्यान, महिला कैद्यांची परिस्थिती तसेच त्यांचे काम आणि इतर वागणूक याबाबत देखील चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे.


त्रिसदस्यिय एसआयटीची स्थापना

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी त्रिसदस्यिय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशी समितीत माजी न्यायाधीश, महिला पोलिस अधिकारी आणि एका महिलेचा समावेश असून, ही समिती पोलिस आयुक्त अणि महिला आयोगाला हा अहवाल देत, तो मुख्यंमत्र्याकडे सादर केला जाणार आहे.


मंजुलावर लैंगिक अत्याचार - इंद्राणी मुखर्जी

शीना बोरा हत्याकांडातली प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने मंजुळावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र मंजुळाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये तिच्या गुप्तांगावर कोणत्याही जखमा असल्याची बाब नमूद करण्यात आलेली नाही. हा अहवाल तुरुंग प्रशासनातर्फे गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आला.
इंद्राणी मुखर्जीने, मंजुळावर निर्भयासारखेच अत्याचार केले जात असल्याचा आरोप केला होता. तसेच भायखळा जेलमध्ये झालेल्या या घटनेनंतर महिला कैद्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यावेळी महिलांना मारहाण करण्यासाठी पोलिसही लाठ्या घेऊन आले होते, असाही आरोप इंद्राणीने केला होता. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. याबाबत महिला आयोगाने सुमोटो समिती स्थापन केली आहे. जेल अधीक्षकांनी शवविच्छेदन अहवाल घेऊन हजर राहावे, असेही म्हटले आहे.


मंजुळा शेट्ये प्रकरण नेमके काय आहे?

हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या मंजुला शेट्ये यांचा 24 जून 2017 रोजी भायखळा तुरुंगात मृत्यू झाला. हा मृत्यू तुरुंग अधिकाऱ्यांच्या मारहाणीत झाल्याची माहिती समोर आली होती. मंजुळा शेट्येच्या मृत्यूपूर्वी तिला नग्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचाही आरोप करण्यात आला होता.

मंजुळाकडून दोन अंडी पाच पाव याचा हिशेब लागत नव्हता म्हणून ही अमानुष मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये तिला निर्वस्त्र करून मारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच इंद्राणी मुखर्जी आणि इतर महिला कैद्यांनी मंजुळावर तुरुंग अधिकाऱ्यांनी अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर तेव्हाच्या जेलच्या अधीक्षक मनीषा पोखरकरसह अन्य पाच जेलच्या गार्डस् विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून सगळ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 


हे देखील वाचा - 

महिला कैद्याचा मृत्यू : 6 जणांवर हत्येचा गुन्हा


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा