अभिनेता आदित्य पांचोलीच्या अडचणीत वाढ


अभिनेता आदित्य पांचोलीच्या अडचणीत वाढ
SHARES

अभिनेता आदित्य पांचोली विरोधात एका मॅकेनिकनं वर्सोवा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. लॅण्ड क्रूझर गाडीची दुरूस्ती केल्यानंतर धमकावून पैसे देण्यास नकार दिल्याचा आरोप आदित्य वर मॅकेनिकनं आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.


प्रकरण काय?

जोगेश्वरी पश्चिम परिसरात एस.व्ही रोडवर तक्रारदार मोसीन राजपकर राहतात. मागील अनेक वर्षांपासून मोसीन हे आदित्य पांचोली यांना ओळखतात. पांचोली यांच्या गाडीचं यापूर्वी ही मोसीन यांनी काम केलं आहे. दरम्यान १० मार्च २०१७ रोजी आदित्यने मोसीनला फोन करून घरी बोलावून घेतलं होतं. मोसीन घरी आल्यानंतर आदित्यने त्याची एमएच ०१ पीए ४५ ही बंद पडलेली लॅण्ड क्रूझर गाडी दुरूस्त करण्यास सांगितलं. दुरुस्तीसाठी होणारा खर्च देण्याची कबूलीही दिली. गाडी पूर्ण पणे बंद असल्यामुळे मोसीनने १२ मार्च २०१७ रोजी गाडीचं काम पांचोलीच्या घराबाहेरच सुरू केलं. १८ मार्च २०१७ रोजी गाडी सुरू करून मोसीनने दुरूस्तीसाठी शांती मोटार्स गॅरेज, जुहू कोळीवाडा येथे नेली. मात्र गाडीचं साहित्य मुंबईत मिळत नसल्यामुळं १७ जुलै २०१७ रोजी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मदतीने मोसीनने गाडी दिल्लीला नेली. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी गाडीचं काम पूर्ण करून मोसीनने गाडी पुन्हा मुंबईत आणली. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी मोसीनने गाडी सूरजच्या घरी सोडली. आदित्यची गाडी दुरूस्ती करण्यासाठी २ लाख ८५ हजार १५८ रुपये खर्च आला.

गाडीच्या दुरुस्तीसाठी झालेला खर्च मिळावा यासाठी मोसीनने वारंवार आदित्य यांच्याशी संपर्क साधला. मात्र आदित्य यांनी वेळोवेळी मोसीनला शिवीगाळ करत पैसे न देता मारण्याची धमकी दिल्याचं मोसीननं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी सोमवारी दुपारी मोसीननं वर्सोवा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी आदित्यवर अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.


हेही वाचा -

भारताला झटका, मेहुल चोक्सीनं सोडलं भारतीय नागरिकत्व

रिक्षातील महिलांचे दागिने-बॅग चोरणारे सराईत चोरटे अखेर पोलिसांच्या हाती



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा