म्हाडा म्हणते, सरकारी बाबूंची 'मैत्री' वैध

 Mumbai
म्हाडा म्हणते, सरकारी बाबूंची 'मैत्री' वैध

कलिना - प्रशासकीय अधिकारी आणि सरकारी सेवेतील उच्च अधिकाऱ्यांसाठी म्हाडाकडून कलिना येथील कोळे कल्याण परिसरात बांधण्यात येत असलेल्या 'मैत्री' प्रकल्पात कुठेही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. हा प्रकल्प वैध असल्याचा दावा म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे. या प्रकल्पासाठी मिळालेल्या एफएसआयचा वापर करतच बांधकाम करण्यात आल्याने येथे अवैध बांधकामाचा संबंधच येत नाही. म्हाडाच्या इतिहासात आतापर्यंत कधीही अवैध बांधकाम झालेले नसल्याचेही झेंडे यांनी स्पष्ट केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मात्र पालिकेची परवानगी न घेता बांधकाम करणे अवैध नाही का? असा पुनरूच्चार करत म्हाडाकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे आता मैत्रीचा गुंता वाढतच चालला आहे.

मैत्री प्रकल्पासाठी केवळ दोन मजल्यांच्या बांधकामाची परवानगी असताना म्हाडाकडून 12 मजल्यांचे काम करण्यात आले. अनधिकृत बांधकाम केल्यानंतर हे बांधकाम अधिकृत करण्यासाठी पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचेही माहिती अधिकारातून समोर आल्याचा दावा गलगली यांनी केला आहे. त्यामुळे सध्या म्हाडा आणि सरकारी बाबूंच्या अवैध मैत्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. पालिका ज्याप्रमाणे इतर अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत आहे तसा हातोडा या मैत्रीवर चालवणार का? असा सवाल केला जात आहे.

एफएसआयचा वापर करत बांधकाम करणे हे अवैध कसे असाच उलट सवाल करत झेंडे यांनी अवैध 'मैत्री' संदर्भातील सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, गलगली यांनी मुख्यमंत्री तसेच पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे एमआरटीपी कायद्यांतर्गत म्हाडा आणि मैत्री सोसायटीच्या 84 सदस्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तेव्हा मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading Comments