आमदार प्रताप सरनाईकांच्या वाढदिवशी झाली होती भेट, रेणू शर्मानं सोडलं मौन


आमदार प्रताप सरनाईकांच्या वाढदिवशी झाली होती भेट, रेणू शर्मानं सोडलं मौन
SHARES

बलात्काराच्या आरोपावरून सध्या राज्याच्या राजकारणाचे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यभरातून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. अशातच विरोधी पक्षातले  भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केल्याने मुंडेना जरा दिलासा मिळाला आहे. हेगडेंच्या आरोपानंतर  आता रेणू शर्माने ही मौन सोडत, सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते, असेही तिने यावेळी स्पष्टीकरण दिलं. मात्र रेणुच्या ट्विटमुळे सरनाईकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे विवाहबाह्य संबध आणि त्याच्यावर बलात्काराचे आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खुद्द पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असल्याची प्रतिक्रिया देत, पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुंडे प्रकरणावर निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. अशातच भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी मुंडेवर आरोप करणारी महिला रेणू शर्मा हिने आपल्याला देखील अशा प्रकारे जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फौट करत पोलिसात तक्रार दाखल केली. विरोधी पक्षातील नेत्यानेच हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे मुंडेना दिलासा मिळाला. मात्र आधीच ईडीच्या रडारवर असलेल्या प्रताप सरनाईकांच्या डोकेदुखीत मात्र वाढ झाली. हेगडेंच्या आरोपावर रेणूने मौन सोडत प्रतास सरनाईकांच्या पार्टीत हेगडेंशी ओळख झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे.  तसेच कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे, ते खोटे व बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ट्विट रेणूने केलं आहे. 

रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहे.'रेणू शर्मा नावाची महिला मला २०१० पासून सतत फोन करून आणि मेसेज करून तिच्याशी संबंध ठेवावेत अशी गळ घालत होती. माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती अशा प्रकारे जाळं टाकून त्यात भुलवून  ब्लॅकमेल करते आणि पैसे लुबाडते. मी तिच्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलो. तिला एकदाही भेटलो नाही. दोन दिवसांपूर्वी तिने धनंजय मुंडेंवर आरोप केलेले पाहिले आणि मी पोलिसांना ही माहिती देण्यासाठी पुढे आलो', असं हेगडे यांनी म्हटलं आहे. ही बातमी सोशल मीडियावरील रेणू शर्मा यांच्या ट्विटवरुन करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून अद्याप यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यांनी याबाबत वक्तव्य केल्यास बातमी अपडेट करण्यात येईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा