ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीयाला झोडपलं

भररस्त्यात देहविक्री करणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात आंदोलन करत मनसे कार्यकर्त्यांनी एका तृतीयपंथीला बेदम चोप दिला. या तृतीयपंथीला मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या हवाली केलं असून पोलिस याप्रकरणी कारवाई करत आहेत.

ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीयाला झोडपलं
SHARES

नाणार प्रकल्प असो वा बुलेट ट्रेन वा फेरीवाल्यांचा प्रश्न मनसेचं कुठं ना कुठं तरी खळखट्याक सुरूच असतं. रविवारी मात्र मनसेनं एका वेगळ्याच्या विषयावर राडा केला. नाशिक महामार्गाला लागून असणाऱ्या ठाण्यातील माजिवडा परिसरात नागरिकांची लुटमार करणाऱ्या तसंच भररस्त्यात देहविक्री करणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात आंदोलन करत मनसे कार्यकर्त्यांनी एका तृतीयपंथीयाला बेदम चोप दिला.



या तृतीयपंथीयाला मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या हवाली केलं असून पोलिस याप्रकरणी कारवाई करत आहेत. तर दुसरीकडं कायदा हातात घेणाऱ्या मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अविनाश पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दुजोरा दिला.


'अशी' करायची लूट

माजिवडा परिसरातील रस्त्यावर अंदाजे ४० तृतीयपंथी गेल्या कित्येक वर्षांपासून देहविक्री करत आहेत. इतकचं नव्हे तर हे तृतीयपंथी रस्त्यावरून जाणारे ट्रक आणि गाड्यांना अडवून लोकांना लुटतात. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचीही लूट करतात. या रस्त्याला लागूनच लोढा आणि रूस्तमजी काॅम्प्लेक्स असून याचा त्रास या काॅम्प्लेक्समधील रहिवाशांनाही होत होता. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात मनसेकडून १५ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पण पोलिस मूग गिळून गप्प होते, असा आरोप पाटील यांनी केला.


तरूणीला लुटण्याचा प्रयत्न

पोलिस या प्रकाराकडे कानाडोळा करत असल्यानं या तृतीयपंथीयांचं फावत होतं. शनिवारी रात्री या रस्त्यावरून जाणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीला लुटण्याचा प्रयत्न या तृतीयपंथीयांनी केला. त्यानंतर मनसेनं आक्रमक होत कायदा हातात घेतला. मनसे कार्यकर्त्यांसह स्थानिकांनी रविवारी या रस्त्यावर धडकत तृतीयपंथींना पकडण्याचा प्रयत्न केला. पण सगळे तृतीयपंथी पळून जाण्यात यशस्वी ठरले आणि एकच तृतीयपंथी मनसेच्या हाती लागला. मग काय या तृतीयपंथीला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम चोपत पोलिसांच्या हवाली केलं.


व्हिडियो व्हायरल

या प्रकाराचा व्हिडियो रविवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर एकीकडं मनसेचं कौतुक होऊ लागलं, तर दुसरीकडे मनसेला टीकेलाही सामोरं जावं लागतं आहे. कायदा हातात घेत अनामुषपणे मारहाण करण्याचा अधिकार मनसेला कुणी दिला? असा सवाल आता सर्वसामान्यांकडून होत आहे.


यासाठी कायदा हातात घेतला

याविषयी पाटील यांना विचारले असता त्यांनी आतापर्यंत १५ तक्रारी झाल्यानंतरही पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसेल आणि हे तृतीयपंथी अती करत असतील, तर आम्ही गप्प बसायचं का? शनिवारी त्या २४ वर्षीय मुलीवर काही अतिप्रसंग ओढावला असता तर त्याला कोण जबाबदार? असं म्हणत पाटील यांनी आपण जे केलं ते योग्यच होत आणि यापुढंही चांगल्या गोष्टींसाठी कायदा हातात घेऊ असं म्हणत रविवारच्या मारहाणीचं समर्थन केलं आहे.


दुरावस्थेला महापालिका जबाबदार

याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात पाटील यांच्यासह १० कार्यकर्त्यांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडं मनसे कार्यकर्त्यांनी माजिवडा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ठाणे महापालिकेचं लक्ष वेधलं आहे. सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याला भेट देत वाढलेली झुडपं आणि झाडांच्या फांद्या छाटण्यास सुरूवात केली आहे. तर रस्ता नव्यानं बांधून नागरिकांसाठी सुरक्षित करून देण्याचंही महापालिकेनं आश्वासन दिल्याचंही पाटील यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा-

शिवसेना-मनसेच्या युतीसाठी 'तो' चढला पुलावर

'हो ती क्लिप माझीच, पण...' - मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर पलटवार!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा