Advertisement

बुलेट ट्रेनचं सर्वेक्षण रोखणाऱ्या मनसैनिकांना तुरूंगवारी...

बुलेट ट्रेनचं सर्वेक्षण रोखणाऱ्या 8 मनसैनिकांनी सोमवारी डायघर-शिळफाटा पोलिसांनी अटक केली होती. या 8 मनसैनिकांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बुलेट ट्रेनचं सर्वेक्षण रोखणाऱ्या मनसैनिकांना तुरूंगवारी...
SHARES

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला जोरदार विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी ठाण्यातील डायघर-दिवा इथलं बुलेट ट्रेनचं सर्वेक्षण रोखलं होतं. हे सर्वेक्षण रोखणाऱ्या 8 मनसैनिकांनी सोमवारी डायघर-शिळफाटा पोलिसांनी अटक केली होती. या 8 मनसैनिकांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


'विरोध सुरूच ठेवणार'

'मनसैनिकांना अटक झाली, त्यांना तुरूंगात टाकलं आणि त्यांच्यावर कितीही खटले टाकले तरी बुलेट ट्रेनला विरोध सुरूच राहिल, कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण होऊ देणार नाही', अशी प्रतिक्रिया मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.


राज ठाकरेंचा विरोध

एक लाख 10 हजार कोटी रुपये खर्च करत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घातलेला घाट हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी असल्याचं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघरच्या सभेत प्रकल्पाला जोरदार विरोध करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी डायघर-शिळफाटा इथं तर बुधवारी पालघर येथील टेम्बी-खोडावे इथलं बुलेट ट्रेनचं सर्वेक्षण रोखून धरलं होतं. शिवाय अधिकाऱ्यांनाही हुसकावून लावलं होतं.


मनसैनिकांना पोलिस कोठडी

ठाणे तहसील कार्यालयानं सोमवारी डायघर-शिळ पोलिस ठाण्यात मनसेविरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती. सरकारी कामात अडथळा आणला असं या तक्रारीत म्हटलं होतं. त्यानुसार पोलिसांनी पुढची प्रक्रिया पार पाडत सोमवारी उशिरा 8 मनसैनिकांना अटक केली होती. या मनसैनिकांना नुकतचं न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.


मनसेचा प्रकल्पाला विरोध ठाम

एकीकडे बुलेट ट्रेनचं सर्वेक्षण रोखणं मनसैनिकांना महागात पडल्याचं म्हटलं जात असलं तरी मनसे मात्र बुलेट ट्रेनप्रकरणी अजूनही आक्रमक आहे. यापुढेही सर्वेक्षणाला आणि प्रकल्पाला विरोध करणारच यावर ठाम आहे. त्यामुळे येत्या काळात बुलेट ट्रेनचा विषय चिघळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा - 

बुलेट ट्रेनवर पुन्हा धडकलं मनसेचं इंजिन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा