एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देतो म्हणून मुंबई पोलिस दलातील एका पोलिस उपनिरीक्षकाने डाॅक्टरला ६१ लाखांना गंडा घातल्याची घडना उघडकीस आली आहे. मिलिंद हिरवे असे या आरोपी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिरवेला पोलिस सेवेतून निलंबित केले आहे.
मुंबईच्या भायखळा परिसरात डाॅक्टर अब्दुल वाहिद अब्दुल गफार अन्सारी (६०) हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. अन्सारी यांची मुलगी सिंद्रा अन्सारी ही देखील वडिलांप्रमाणे डाॅक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून वैद्यकिय शिक्षण घेत आहे. सिंद्राला परळच्या के.ई.एम रुग्णालयाच्या वैद्यकिय महाविद्यालयातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे होते. त्यासाठी ती प्रयत्न देखील करत होती. मात्र वेळोवेळी तिला अपयश येत होते. याच दरम्यान अब्दुल अन्सारी यांची ओळख हिरवे याच्याशी झाली. अब्दुल अन्सारी यांनी आपल्या मुलीच्या अॅडमिशनची अडचण हिरवेला सांगितली. त्यावर हिरवेने आपल्या मंत्रालयातील ओळखीतून सिंद्राचे अॅडमिशन करून देतो असे आश्वासन डाॅ अन्सारी यांना दिले. मात्र त्यासाठी पैसे भरण्याची अट त्यांनी अन्सारी यांना टाकली. मुलीच्या उज्वल भविष्यासाठी अन्सारी हे देखील जमापुंजी गोळाकरून हिरवेच्या मागणीनुसार त्याला ६१ लाख ५० हजार रुपये दिले होते.
मात्र कित्येक महिने उलटून ही मुलीचे अॅडमिशन होत नसल्याने अन्सारी यांनी हिरवे यांच्याजवळ विचारपूस केली. त्यावेळी हिरवेने त्यांना टाळण्यास सुरूवात केली. अन्सारी यांनी अॅडमिशनबाबत परळच्या के.ई.एम वैद्यकिय महाविद्यालयात चौकशी केली असता. हिरवेने आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार अन्सारी यांनी आॅक्टोंबर १९ मध्ये हिरवे विरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा ४२०,३४ भा.द.वी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मिलिंद हिरवे याच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.