पल्लवी पुरकायस्थचा मारेकरी दीड वर्षांनी गजाआड


पल्लवी पुरकायस्थचा मारेकरी दीड वर्षांनी गजाआड
SHARES

मुंबई पोलिसांची तुलना नेहमीच स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी केली जाते. मंगळवारी याचा सर्वांनाच प्रत्यय आला. पल्लवी पुरकायस्थ या महिला वकिलाची हत्या करून पॅरोलवर असताना पळून जाणारा आरोपी सज्जाद मुघल याला मुंबई पोलिसांनी तब्बल दीड वर्षांनी गजाआड केलं आहे.


काय आहे प्रकरण?

ऑगस्ट २०१२ मध्ये वडाळ्याच्या हिमालयन हाईट्स येथे राहणाऱ्या अॅड. पल्लवी पुरकायस्थ या तरूणीची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेने त्याच इमारतीतील सुरक्षा रक्षक सज्जाद मुघलला अटक केली. पोलिसांच्या यशस्वी तपासानंतर पल्लवीची हत्या केल्याबद्दल न्यायालयाने त्याला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सज्जादची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली.



पुन्हा कारागृहात परतलाच नाही

मात्र, फेब्रुवारी २०१६ मध्ये केवळ १ महिन्यांच्या पॅरोलवर कारागृहाबाहेर आलेला सज्जाद पुन्हा कारागृहात परतलाच नाही. आधीच हे प्रकरण खूप गाजलं होतं, त्यात सज्जादने पळ काढल्यानं त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांवरील दबाव वाढला. महत्त्वाचं म्हणजे त्याला पॅरोल मंजूर करताना मुंबई पोलिसांचं मत विचारात घेण्यात आलं नव्हतं.


कशी केली अटक ?

सज्जाद काश्मीरी असल्याने मुंबई पोलिसांसाठी त्याला पकडणं खूपच कठीण होऊन बसलं होतं. कारण सज्जादचं गाव सलामाबाद पाकिस्तानपासून केवळ १६ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पोलीस तिथे घुसूच शकत नव्हते. पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्या नेतृत्वाखाली बनावण्यात आलेल्या विशेष पथकाला अनेकदा रिकाम्या हातानं परताव लागत होतं.



खबरे पेरले

अखेर या पथकानं त्याच्या गावाजवळ असलेल्या गगनगीर नावाच्या गावात काही खबरे तयार केले. या खबऱ्याचं नेटवर्क तयार करणं खूपच कामाला आलं. एका खबऱ्यानं सज्जाद टनलच्या कामासाठी तिथे आल्याची खबर निकम यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तिथं सापळा रचून सज्जादला ताब्यात घेतलं.


वेश बदलला

सज्जादला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय निकम यानी आपला वेश देखील बदलला. त्यांनी 'फेरन' नावाचा कश्मीरी लोकांचा पोशाख परिधान केला. तिथल्या स्टाइलने दाढी ठेवली आणि पर्यटक बनून तिथे राहिले. ही सर्व मेहनत सज्जादच्या अटकेनं फळली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा