गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
SHARES

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणपती अागमनापासून ते विसर्जनापर्यंत सुरक्षेचा अॅक्शन प्लॅनच मुंबई पोलिसांनी तयार केला आहे. राज्य सरकारही मुंबईतील गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.  


असा असेल बंदोबस्त

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सगळ्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. यावेळी मुंबई पोलिसांच्या ४० हजारांच्या स्ट्रॉंग फोर्सच्या मदतीला राज्य राखीव पोलीस बल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, होम गार्ड यांच्यासह नागरी सुरक्षा दलाचे १ हजार जवानांचे पथक तैनात असेल. वाहतुकीची व्यवस्था हाताळायला ३,६०० वाहतूक पोलीस, त्यांच्या जोडीला ५०० ट्रॅफिक वॉर्डन असतील. महत्वाच्या ठिकाणी बॉम्बशोधक पथकही असेल.

यंदा मुंबईतील महत्त्वाची मंडळे आणि संवेदनशील ठिकाणी विशेष सुरक्षा देण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत. लालबागच्या राजाला दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असून राजाच्या सुरक्षेसाठी 'विशेष कमांड सेंटर' स्थापन करण्यात आले आहे.

यावर्षी मुंबईत एकूण ७६१० सार्वजनिक गणपती बसणार असून त्यासाठी ११९ विसर्जन स्थळ आहेत. घरगुती गणपतींची संख्या सव्वा लाखांच्या घरात आहे. ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवले जाणार आहे. गणेशोत्सव मंडळांना देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मुंबई पोलिसांनी सांगितल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्त्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी दिली.


महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी

गणेशोत्सवादरम्यान होणारी प्रचंड गर्दी बघता महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यावेळी गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साध्या वेशातील पोलिसांचे विशेष पथक करण्यात आले आहे. हे पथक स्वतः गर्दीत घुसून विकृतांच्या मुसक्या आवळतील.

मुंबईवर असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता विसर्जन स्थळी वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. शहरातील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून कोंबिंग ऑपरेशन देखील राबविण्यात येईल, असेही करंदीकर यांनी सांगितले.


सोशल मीडियावर नजर

गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही अफवांना उधाण येऊ नये म्हणून पोलिसांनी सोशल मीडियावर देखील करडी नजर ठेवण्याचे ठरवले आहे. अभिलेखावरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास देखील मुंबई पोलिसांनी सुरूवात केली आहे.


वाहतूक नियोजन

अकरा दिवसांच्या या महासोहळ्या दरम्यान वाहतुकीचे नियोजन महत्त्वाचे ठरते. त्यानुसार ९९ ठिकाणी पार्किंग पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याच बरोबर ५४ रस्ते वन वे, तर ५३ रस्ते वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.



हे देखील वाचा -

ही मंडळं ठरणार गणेशोत्सवात प्रमुख आकर्षण!

पीओपी आणि शाडूनंतर आता एलईडी गणेशमूर्ती!



 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा