आपल्या बाप्पाची मूर्ती अधिकाधिक आकर्षक असावी, असे सर्वच गणेशभक्तांना वाटते. तोच विचार करून मूर्तीकार नेहमीच वेगवेगळी शक्कल लढवून अधिकाधिक आकर्षक मूर्ती बनवत असतात.
हिरे, मोती आणि रंगीबेरंगी खड्यांनी सजलेली गणेशमूर्ती आपण पाहिली असेलच. परंतु घाटकोपरमधील एका अवलिया मूर्तीकाराने तर चक्क एलईडी लाईट आणि रिमोट यांच्या मदतीने स्पेशल बाप्पा तयार केला आहे.
घाटकोपरच्या साईनाथनगरमध्ये असलेल्या प्रांजल गणेश कला केंद्राच्या नितीन चौधरी यांनी या अनोख्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. गणेश मूर्तीमध्ये रिमोटवर चालणाऱ्या एलईडी दिव्यांची अशी रचना केली आहे की, या एलईडी आपल्याला रिमोटद्वारे हव्या तशा चालू, बंद आणि बदलता देखील येतात. गणेशमूर्तीच्या मुकुटात, दागिन्यांत, सिंहासनावर आणि हातात दिवे आकर्षक पद्धतीने बसवले आहेत. ज्यामुळे या गणेशमूर्ती अतिशय आकर्षक तर दिसतातच, त्याचबरोबर गणेशोत्सवाला वेगळी दिव्यांची आरास करण्याची गरज देखील भासणार नाही. या मूर्तींना मोठ्या प्रमाणात सध्या प्रतिसाद मिळत आहे.
नितीन चौधरी यांचा नाटकांसाठी प्रकाशव्यवस्था करण्याचा व्यवसाय आहे. यातूनच त्यांना विजेची व्यवस्था आणि या तंत्रज्ञानाबाबत सखोल ज्ञान आहे. तरीही छंद म्हणून गेली सात वर्ष ते गणेशमूर्ती विक्रीसाठी प्रांजल गणेश कला केंद्र चालवत आहेत.
सुरुवातीला त्यांनी हिरे आणि चमकीच्या सहाय्याने मूर्ती बनवल्या. परंतु, गेल्या वर्षीपासून त्यांनी रंगीबेरंगी एलईडीचा वापर सुरु केला. या मूर्तींना त्यांनी रिमोट कंट्रोलची ही जोड दिली. या एलईडी गणेशाचे विसर्जन होत नाही. या मूर्ती तशाच ठेवता येतात. वाहनांतून घेऊन जाताना गाडीतील विजेवरही ही एलईडी लाईट सुरू ठेवता येणे शक्य आहे.
या गणेशमूर्तींची किंमत संपूर्ण यंत्रणेसह सहा हजारांच्या आसपास असून या मूर्तींना सध्या मोठी मागणी आहे.
या वर्षी गोवा, पुणे, कोकण, सातारा, सांगली इत्यादी विभागांसह मुंबईतही अनेक ठिकाणी रिमोटवरील एलईडी गणेशाची मूर्ती विराजमान होणार असून दिवसेंदिवस या मूर्तींची मागणी वाढत आहे.
नितीन चौधरी, मूर्तिकार
भविष्यात सेन्सरवर म्हणजेच टाळी वाजवली की, गणेश मूर्ती विणा वाजवेल आणि सोबतच एलईडी सुरू होईल, अशा मूर्ती बनवणार असल्याचे आणि त्यावर संशोधन सुरू असल्याचे नितीन चौधरी यांनी सांगितले.
गणेशाच्या मूर्तीसाठी दिव्यांची वेगळी आरास, भव्य दिव्य मखरावर देखील मोठा खर्च करावा लागत होता. पण, एलईडी बाप्पा असल्यामुळे मखर आणि दिव्यांची अरास यावरील खर्च कमी झाला असून आता मूर्तीमध्ये रिमोटवर चालणाऱ्या दिव्यांनी बाप्पाचे रुप अजून आकर्षित करत आहे.
अभिजीत कानसे, ग्राहक
हेही वाचा -
बाप्पासाठी खास २१ प्रकारचे मोदक!
गणेशोत्सवात 'असे' व्हावे प्रसादवाटप