Mumbai Vaccination Scam : रुग्णालयातील कर्मचाऱ्याला बारामतीतून अटक

बोगस लसीकरण प्रकरणात मुंबईतील कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील एकाला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Vaccination Scam :  रुग्णालयातील कर्मचाऱ्याला बारामतीतून अटक
(Representational Image)
SHARES

बोगस लसीकरण प्रकरणात मुंबईतील कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात कर्मचारी असलेला राजेश पांडे याला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक केली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. इथं आयोजित लसीकरण शिबिरात प्रतिडोस १ हजार २६० रुपये आकारले जात होते. या प्रकरणात आता मुंबई शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या या टोळीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून एका पत्रकाद्वारे या कारवाईबद्दलची माहिती देण्यात आली आहे. यापुर्वी गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपींनी लसींचा पुरवठा करण्यासाठी वापरलेलं वाहन क्रीम रंगाची टोयोटा कोराला ही कार जप्त करण्यात आली आहे. तसंच गुन्ह्यातले मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंह आणि मनीष त्रिपाठी यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

गुन्ह्यासाठी वापरल्या गेलेल्या लसींचा पुरवठा चारकोपच्या शिवम हॉस्पिटलमधून होत असल्यानं या हॉस्पिटलचे डॉ. शिवराम पटारिया आणि निता पटारिया यांनाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबईमध्ये आतापर्यंत नऊ ठिकाणी बनावट लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या बनावट लसीकरण शिबिरांद्वारे २ हजार ०५३ लोकांची फसवणूक झाली, अशी माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली होती.

इतक्या मोठ्या प्रमाणात लोक लसीकरण घोटाळ्याला बळी पडले असल्याची दखल घेत हायकोर्टाने म्हटलं की, “त्या लोकांची नेमकी काय स्थिती आहे याची आम्हाला चिंता आहे. त्यांची तपासणी होणं गरजेचं आहे. बनावट लसीचे काही दुष्परिणाम जाणवत आहेत का? याची माहिती घ्या. त्यांच्या शरिरात अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत का? त्यांना सलाईन किंवा इतर काही दिलं असेल तर काय?”.

२ हजार ०५३ लोकांना बनावट लसीचा फटका बसला असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली. यामध्ये बोरीवलीमधील ५१४, वर्सोवामधील ३६५, कांदिवलीमधील ३९८, लोअर परळमधील २०७, मालाड पश्चिमेकडील ३० आणि इतर ठिकाणच्या नागरिकांचा समावेश आहे.

कोर्टानं यावेळी सरकारला फटकारत, “तुम्ही इतके प्रयत्न करूनही हे झालं. तुम्ही काय करत होतात?,” अशी विचारणा केली. सरकारनं यावेळी कोर्टाकडे हे प्रकरण हाताळण्यासाठी एक आठवड्यांचा अवधी मागितला आहे. भविष्यात असे घोटाळे होऊ नयेत यासाठी योजना आखली जावी याकरिता कोर्टानं सरकारला पाच दिवसांचा अवधी दिला आहे.हेही वाचा

केंद्राने राज्याला अंधारात ठेवल्यानेच बोगस लसीकरण, नवाब मलिकांचा आरोप

मुंबईनंतर ठाण्यातही बोगस लसीकरण, गुन्हा दाखल

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा