वस्तू हरवल्यास शपथपत्र न घेता तक्रार नोंदवा, पोलीस आयुक्तांचे आदेश

महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू हरवल्यास तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर संबंधित व्यक्तीची अडवणूक केली जाते. अॅफिडेव्हिट (शपथपत्र) तक्रारदाराला आणावयास सांगितले जाते.

वस्तू हरवल्यास शपथपत्र न घेता तक्रार नोंदवा, पोलीस आयुक्तांचे आदेश
SHARES

एखादी वस्तू, पासपोर्ट, चेकबुक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यानंतर फार मोठी अडचण निर्माण होते. वस्तू पुन्हा शोधून काढण्यासाठी नव्याने अर्ज करणे, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणे आदी मोठे सोपस्कार पार पाडावे लागतात. मात्र आता शपथपत्र न देता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवता येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तसं परिपत्रकच काढलं आहे.

महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू हरवल्यास तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर संबंधित व्यक्तीची अडवणूक केली जाते. अॅफिडेव्हिट (शपथपत्र) तक्रारदाराला आणावयास सांगितले जाते. त्यासाठी तक्रारदाराला न्यायालयात जाऊन शपथपत्र नोटरी करून आणावे लागते आणि त्यासाठी पैसेही मोजावे लागतात. मात्र, आता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अशा प्रकरणांची दखल घेतली आहे. त्यांनी गुरुवारी एक पत्रक जारी करून अशा प्रकारच्या शपथपत्राची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

हेमंत नगराळे यांनी जारी केलेल्या या पत्रकात म्हटलं आहे की, तक्रारदार पोलीस ठाण्यात एखादी वस्तू किंवा पारपत्र, चेकबुक, परवाना प्रमाणपत्र यासारखी महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्यावर तक्रार देण्यास येतात. तेव्हा ड्यूटीवरील ठाणे अंमलदार तक्रारदारांना अशा वस्तू गहाळ झाल्याबाबत नोटरीकडून शपथपत्र करून आणण्यास सांगतात. त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यास नकार देतात. ही बाब बेकायदेशीर व आक्षेपार्ह आहे. गहाळ झालेल्या वस्तू अथवा कागदपत्राबाबत शपथपत्र घेण्याची कोणतीही तरतूद प्रचलित कायद्यामध्ये नाही. तरीही पोलिसांकडून अशा शपथपत्राची मागणी केली जाते आणि तक्रारदाराची अडवणूक केली जाते.

एखादी व्यक्ती पोलीस ठाण्यात वस्तू किंवा दस्तावेज गहाळ झाल्याबाबत तक्रार देण्यास आली तर त्याच्याकडून गहाळ झालेल्या वस्तू अगर कागदपत्राबाबत गहाळ प्रमाणपत्र देण्याकरता शपथपत्राची मागणी करण्यात येऊ नये. असे झाल्याचे निदर्शनास आले तर याबाबत गंभीर नोंद घेण्यात येऊन संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी परिपत्रकात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एखादी महत्वाची वस्तू किंवा कागदपत्रे हरवली तर शपथपत्र न देता तुम्ही तक्रार नोंदवून त्याची प्रत प्राप्त करू शकता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा