आता ९ दिवस बंदोबस्ताचे


आता ९ दिवस बंदोबस्ताचे
SHARES

सणा-सुदीच्या दिवसांत जिथे सगळेजण मज्जा करण्याच्या मूडमध्ये असतात, आपल्या घरच्यांबरोबर आनंद साजरा करत असतात, तिथेच पोलीस मात्र बंदोबस्तात घाम गाळत असतात. कधी पावसापाण्यात छत्री रेनकोटच्या आड, तर कधी उन्हातान्हात, पण बंदोबस्त काही संपत नाही.  

दहिहंडीपासून सुरू झालेलं हे बंदोबस्ताच चक्र दिवाळीपर्यंतही थांबत नाही. दहीहंडीनंतर येतात ते गणपती बाप्पा, बाप्पा गेल्यागेल्या देवी बसतात. देवीचं उरकत नाही तोवर दिवाळी येते. दिवाळी झाली की मग ख्रिसमस. असं हे पोलिसांचं बंदोबस्ताचं चक्र दिवसरात्र सुरूच असतं. आता नवरात्र उत्सव सुरू झाल्याने पुढील नऊ दिवस हे बंदोबस्तात जाणार आहेत.


असा आहे नवरात्रीचा बंदोबस्त -

यावर्षी मुंबईत एकूण ४५५२ ठिकाणी देवी बसणार असून त्यात सार्वजनिक देवींची संख्या ही २६१४ आहे. तब्बल ३१०२ ठिकाणी मुंबईभरात दांडिया खेळले जातील. रात्रीच्या वेळेस दांडिया खेळले जात असल्याने तिथे आलेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही मुंबई पोलिसांवर येऊन पडते. गरब्याच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून तेथे सीसीटीव्ही लावण्याचे आदेश आयोजकांना देण्यात आले आहेत. 

प्रत्येक गरब्याच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र (QRT) कृती दल, तसेच बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबईत एकूण ८० ठिकाणी देवीचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.


वेळमर्यादा अशी 

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गरब्यासाठी १० वाजण्याची वेळमर्यादा कायम असून आठव्या आणि नवव्या दिवशी म्हणजेच २८ आणि २९ तारखेला ही मर्यादा १२ वाजेपर्यंत शिथील करण्यात आली आहे.

गुरुवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज असून प्रत्येक ठिकाणी पुरेसा बंदोबस देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्त्या रश्मी करंदीकर यांनी दिली आहे. 

नवरात्रादरम्यान रात्रीच्या वेळी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून गरब्याच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी साध्या वेषातील पोलीस गस्त घालतील. यावेळी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाईल, असंही करंदीकर यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा -

जागर महिलाशक्तीचा : देवाला देवपण देणाऱ्या कलेचा वारसा जपणारी लेक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा