विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होऊन बारा तास उलटत नाही, तोच मंबईत नोटांचा काळाबाजार सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी भुलेश्वर परिसरातून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून ६६ लाख रुपयांची रोकड पकडली आहे. या बेहिशोबी मालमत्तेची नोंद लोकमान्य टिळक नगर पोलिस ठाण्यात करत, पैशांचे आर्थिक व्यवहार समजून घेण्यासाठी हे प्रकरण चौकशी करता प्राप्तिकर विभागाकडं सुपूर्द केलं आहे.
राज्यात निवडणुकीचे पडसाद सुरू होताच राजकीय नेत्यांकडून पैशांची अफरातफर सुरू होते. मुंबईच्या भुलेश्वर पोफळवाडी परिसरातून शनिवारी मुंबई पोलिसांनी एका कार्यालयातून पहिल्याच दिवशी तब्बल ६६ लाख रुपये हस्तगत केले आहेत. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निशित मिश्रा यांना या बेहिशोबी पैशाची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
निवडणुकीच्या कालावधीत रोख रकमेची छुप्या मार्गाने देवाणघेवाण केली जाते. हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहेत. त्यातच ही कारवाई झाली असून टाकलेल्या या छाप्यामध्ये हस्तगत केलेली रक्कम आणि त्याचा तपशील प्राप्तिकर विभागाला देण्यात आला आहे. अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -
मयांक टिटोरियलचे संस्थापक मयांक मांडोत यांची हत्या
हत्तीच्या दातांची तस्करी करणारे अटकेत