सिक्युरिटी 'टाईट', तरी ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण वाढलं


सिक्युरिटी 'टाईट', तरी ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण वाढलं
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीनंतर मुंबई पोलिसांनी शहरभरात कडक बंदोबस्त ठेवूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३१ डिसेंबर रोजी मद्यपान करून कार, बाईक चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी मद्यापन करून गाडी चालवल्याबद्दल ५६५ चालकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यात यंदा ५० मद्यपींची सख्या वाढली आहे.


किती जणांवर कारवाई?

मद्यपान करून नवीन वर्ष साजरं करणाऱ्यांची मुंबई मोठी संख्या आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस ३१ डिसेंबरला दरवर्षी ठिकठिकाणी नाकाबंदी करून ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कारवाई करतात. मुंबईकरांसाठी हे चित्र नवीन नाही. या वर्षी देखील मुंबई वाहतूक पोलिसांनी मद्य पिऊन गाडी चालवल्याबद्दल ३१ डिसेंबर रोजी रात्री उशीरापर्यंत एकून ६१५ मद्यपींवर कारवाई केली आहे.



चोख बंदोबस्त तरीही...

कमला मिल आग प्रकरणानंतर मुंबई महापालिकेने शहरातील बहुतांश बेकायदा रेस्टॉरंट, पब आणि बारवर हातोडा चालवण्याचा धडाका लावला आहे. त्यातच वाहतूक पोलिसांनी शहरातील बार मालकांना मद्यपी ग्राहकांसाठी चालक अथवा टॅक्सी पुरवण्याची विनंती केली होती. साधारणत: दीड हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले होते. यामुळे यावर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हची प्रकरणे कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु हे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढल्याचं दिसत आहे.


इतर कारवाई काय?

या शिवाय वाहतूक पोलिसांनी हेल्मेटशिवाय गाडी चालवण्याबद्दल १९९ वाहनचालकांवर, वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी २ वाहनचालकांवर, नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्याबद्दल ६२० वाहनांवर कारवाई केली. अशाप्रकारे वाहतूक पोलिसांनी एकूण ३१८८ जणावर कारवाई केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा