गाणं वाजवताना जपून, नाहीतर तुमचीच 'वाजेल'


गाणं वाजवताना जपून, नाहीतर तुमचीच 'वाजेल'
SHARES

व्यावसायिक ठिकाणी मनोरंजनासाठी गाणं वाजवत असाल, तर सावधान कारण तुमच्यावरही काॅपी राईटचा गुन्हा दाखल होऊ शकतो. वांद्र्यातील पालीहिल इथल्या एका प्रसिद्ध हाॅटेलमध्ये एका नामांकीत म्युझिक कंपनीच्या पूर्वपरवानगी शिवाय गाणं वाजवण्यात आलं होतं. त्यावर संबंधित म्युझिक कंपनीने आक्षेप घेतल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार हाॅटेलविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


नेमकं प्रकरण काय?

देशभरात 'बी फिश व्हेंचर्स प्रा.लि' कंपनीचे विविध हाॅटेल्स आहेत. याच कंपनीचं एक हाॅटेल वांद्र्यातील पालीहिल येथे 'जंक यार्ड कॅफे' नावाने सुरू आहे. मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी या कॅफेत खवय्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, अशा खवय्यांच्या मनोरंजनासाठी ८ फेब्रुवारी २०१७ रोजी या कॅफेमध्ये यशराज फिल्म्स आणि झी स्टुडिओची गाणी विनापरवानगी वाजवण्यात आली. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या सिनेमांच्या गाण्याचे काॅपीराईट्स 'नोव्हेक्स कम्युनिकेशन प्रा.लि.' या कंपनीला दिले आहेत.

मात्र संबंधित कॅफेने 'नोव्हेक्स कम्युनिकेशन' कंपनीकडून याबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे 'नोव्हेक्स'ने त्यावर आक्षेप घेत, संबधित कॅफेविरोधात वांद्रे न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने सीआरपीसी १५६(३) नुसार वांद्रे पोलिसांना संबधित कॅफे व्यवस्थापनावर गुन्हा नोंदवून चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी ४१८, ३४ आणि काॅपी राईट्स अॅक्टनुसार गुन्हा नोंदवल्याची माहिती वांद्रे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


‘आयपीआरएस’ म्हणजे काय?

हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार-संगीतकारांना कॉपीराइट्स कायद्यानुसार गाण्यांची रॉयल्टी मिळावी या हेतूने १९६९ साली 'द इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड' (आयपीआरएस)ची स्थापना करण्यात आली. मूळ गाण्यांची नक्कल कुठे होत असेल तर कॉपीराइट कायद्याच्या माध्यमातून संबंधितांकडून त्याची रॉयल्टी वसुली करून त्या-त्या कलाकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे अधिकार शासनातर्फे 'आयपीआरएस'ला देण्यात आले आहेत.

संगीतकार, गीतकार, संगीत प्रकाशकांचे प्रतिनिधित्व करणारी ही संस्था आहे. तसंच भारतातील संगीत रचना आणि साहित्य संगीत वापरासाठी कुठल्याही व्यक्तीला परवाने जारी करणारी ही देशातील एकमेव अधिकृत संस्था आहे. 'आयपीआरएस'चं कॉर्पोरेट ऑफिस मुंबईला असून दिल्ली, चेन्नई, कोलकातामधील ब्रँच ऑफिसांमधूनही परवान्यांचं काम होतं.


या पूर्वीची उदाहरणे

जुन्या चित्रपट गीतांविषयी गप्पा आणि चर्चा नेहमीच रंगतात. मात्र, ही गाणी नेमकी कुणाच्या मालकीची असतात? त्यांच्यात कुणाकुणाचे कायदेशीर अधिकार गुंतलेले असतात? ती कुणाचीही परवानगी न घेता सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सादर करता येतात का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. काही दिवसांपूर्वी दक्षिणेतील नामवंत संगीतकार इलयाराजा यांनी कायदेशीर नोटीस पाठवून गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी इलयाराजांनी संगीतबद्ध केलेली गाणी सार्वजनिक कार्यक्रमात गायला हरकत घेतली होती. त्यांचं म्हणणे होते की गाण्याच्या सांगीतिक रचनेवर त्याचे कॉपीराइट आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा