धक्कादायक! पत्रकाराला धावत्या लोकलमधून खाली फेकण्याचा प्रयत्न

लोकल ट्रेनमधील घोळक्याने पत्रकार सुधीर शुक्ला यांना डोक्यातून रक्त येईपर्यंत मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी शुक्ला यांना दरवाज्याजवळ नेत त्यांची कॉलर पकडून त्यांना दरवाज्याजवळ लटकवलं. सुदैवाने, सुधीर शुक्ला यांनी खांबाला घट्ट पकडलं असल्याने ते ट्रेनमधून खाली पडले नाहीत.

धक्कादायक! पत्रकाराला धावत्या लोकलमधून खाली फेकण्याचा प्रयत्न
SHARES

मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये घोळक्यांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही घोळक्यांच्या अरेरावीला लगाम बसलेला नाही. मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार सुधीर शुक्ला बुधवारी सकाळी याच दादागिरीचा बळी ठरले. 


नेमकं काय घडलं?

नामांकीत हिंदी न्यूज चॅनलचे वरिष्ठ पत्रकार सुधीर शुक्ला अंधेरीला जाण्यासाठी मिरारोड स्थानकात लोकल ट्रेनची प्रतिक्षा करत होते. लोकल येताच त्यांनी गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीत चढत असताना दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या घोळक्याने त्यांना गाडीत चढण्यास मज्जाव केला. तरी, सुधीर शुक्ला आणि इतर काही प्रवासी गाडीत चढले. लोकल मिरारोड स्थानकावरून सुटल्यावरही घोळक्याची अरेरावी सुरूच होती. त्यांनी पत्रकार आणि इतरांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच सुधीर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, या घोळक्यातील काहीजण शुक्ला यांनाच दमदाटी करू लागले.

धक्काबुक्कीनंतर मारहाण

सुधीर शुक्ला यांनी धक्काबुक्की करत असलेल्या व्यक्तींचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याची कुणकुण घोळक्याला लागली आणि त्यांनी शुक्ला यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांच्या डोक्यातून रक्त येईपर्यंत या गुंडांनी त्यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी शुक्ला यांना दरवाज्याजवळ नेत त्यांची कॉलर पकडून त्यांना दरवाज्याजवळ लटकवलं. सुदैवाने, सुधीर शुक्ला यांनी खांबाला घट्ट पकडलं असल्याने ते ट्रेनमधून खाली पडले नाहीत.

दरम्यान, या प्रकरणी अंधेरीच्या जीआरपीत हत्येचा प्रयत्न आणि दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवाय, मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनने या घटनेचा निषेध नोंदवला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


गुंडगिरीचे अनेक प्रकार उघड

लोकलमध्ये घोळक्याच्या गुंडगिरीचा हा पहिलाच प्रकार नाही. याआधीही अशा बऱ्याच घटना घडला आहेत. विरार ते दादर या ट्रेनमधूनही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे घोळके पाहायला मिळतात. असे ग्रुप ट्रेनमध्ये पत्ते खेळण्यापासून, मोठ-मोठ्याने गाणी म्हणणं, धक्काबुक्की करणं, बसण्याच्या सीटवरून भांडणं, अशा सर्वच प्रकारची गुंडगिरी करून सामान्य प्रवाशांना त्रास देत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. तरीही रेल्वे प्रशासन अशा गुंडगिरी करणाऱ्या ग्रुपवर कधी आणि कशाप्रकारची कारवाई करणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा