वाहतूक पोलिसांनांच बांबू! बेशिस्त वाहन चालकांनी थकवला ४० लाखांचा दंड

मागील ६ महिन्यात शेकडो वाहनचालकांनी ४० लाख ९७ हजार रुपयांचा दंड थकवला आहे. वारंवार वाहतूक नियम मोडले जात असल्याने त्या चालकांवरील दंडाची रक्कम वाढतच आहे.

SHARES

राज्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात सीसीटीव्हींद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या अशा वाहनचालकांना ई-चलन पाठवून दंडाची वसुली केली जाते. मात्र, अनेक वाहनचालकांनी दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली आहे. मागील ६ महिन्यात शेकडो वाहनचालकांनी ४० लाख ९७ हजार रुपयांचा दंड थकवला आहे. वारंवार वाहतूक नियम मोडले जात असल्याने त्या चालकांवरील दंडाची रक्कम वाढतच आहे. या बेशिस्त वाहनचालकांवरील दंडाची रक्कम २०० रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत आहे. हा दंड वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी (महामार्ग पोलीस) राज्यातील सर्व वाहतूक पोलीस विभागांना दिले आहेत. 


वाहनचालक अनभिज्ञ

वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी सीसीटीव्हीमार्फत कारवाई करून दंड वसुली करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून आकारण्यात आलेले दंड आणि त्याची माहिती वाहन चालकाला मिळत नाही. यामुळे आकारण्यात आलेला दंड हा अनेक दिवस पेंडिंग राहत असल्याची माहिती समोर आलीय. नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रथम मुंबईत हा प्रकल्प राबवल्यानंतर त्याची व्याप्ती राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक शहर, जळगाव, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूरपर्यंत वाढवण्यात आली. यात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमार्फत वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनाचा क्रमांक टिपला जातो. कारवाई करून त्यांच्या मोबाइलवर ई-चलान पाठवण्यात येते. चालकाला दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा जवळच्याच वाहतूक पोलीस चौकीत भरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पण तरीसुद्धा लाखो रुपयांचा दंड थकवला गेला असल्याने आता वाहतूक विभाग हा दंड वसूल करण्यासाठी प्रयत्न करत आहे.


वाहन जप्त होणार

मागील सहा महिन्यांत राज्यात वाहनचालकांनी  ४० लाख ९७ हजार ६ रुपयांचा दंड थकवला आहे.  वारंवार वाहतूक नियम मोडल्याने ही दंडाचा रक्कम वाढतच गेली आहे. काही चालकांकडून १० हजारांपासून ते दीड लाखांपर्यंतचा दंड वाहतूक विभागाला येणं बाकी आहे. दिवसेंदिवस ई-चलान न भरलेल्यांची संख्या वाढत असल्याने ती वसूल करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालकांच्या आदेशाने राज्यातील वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून दंड वसुली केली जाणार आहे. दंड न भरलेल्या चालकांना पत्राद्वारे माहिती देण्याबरोबरच, मोबाइल क्रमांकाची नोंदणी असल्याने त्या क्रमांकावर चालकाला फोन करून दंड भरण्यास सांगितलं जाईल. तात्काळ दंड वसुलीही यापुढे कठोरतेने केली जाईल. दंड भरला नाही, तर नियमानुसार वाहन जप्तीची कारवाई होऊ शकते, असे महामार्ग पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

१० हजारांपुढील दंडाची प्रकरणे

  • १ लाख ५२ हजार ८०० रुपये दंड असलेलं १ प्रकरण आहे.
  •  ५० हजार रुपयांवरील दंडाचे ४६ वाहनचालक 
  •  ३० हजार रुपयांवरील दंड ३०९ चालकांनी थकवला
  • २० हजारांच्यावर दंड असलेले १,०६६ जण
  •  उर्वरित दंड थकवलेले १० हजार ते २० हजार रुपयांच्यामधील रक्कम असलेले आहेत.



हेही वाचा - 

महापौरांनी विनयभंग केलाच नाही, 'त्या' महिलेने केला खुलासा!

दाऊदच्या आणखी एका हस्तकाला अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा