ड्रायव्हर-लोडरच्या नावावर कंपन्या! पायधुनीत कस्टम लायसन्सचा घोटाळा उघड


ड्रायव्हर-लोडरच्या नावावर कंपन्या! पायधुनीत कस्टम लायसन्सचा घोटाळा उघड
SHARES

डोंबिवलीतल्या एका बांधकाम मजुराला तो कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या कंपनीचा मालक असल्याचे कळाल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हे सर्व कसे आणि कधी झाले हेच त्याला कळत नव्हते. दारात पोलिस आल्यानंतर तर तो पुरता घाबरला होता. कालांतराने आपल्याच निष्काळजीपणाचा फायदा मित्राने घेतल्याने आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे रहावे लागल्याचा पश्चात्ताप त्याला झाला.


सुधीरच्या घरी मिळाली गुन्ह्यांची सूत्रं

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 च्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवणाऱ्या सुधीर चौधरीला पायधुनी परिसरातून अटक केली होती. त्यावेळी कस्टमचा मोठा घोटाळा आपण उघड करणार असल्याचं पोलिसांच्या गावीही नव्हतं. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी सुधीर चौधरीच्या भायखळा येथील घराची झडती घेतली. त्याच्या घरात पोलिसांना कस्टम व्यवहारांसाठी लागणाऱ्या बँकेच्या सर्विस टॅक्सची कागदपत्रे सापडली.


आरोपी सुधीर चौधरी


ड्रायव्हर-लोडर होते कंपन्यांचे मालक!

पोलिसांनी संबंधित बँक खात्यांवर सुरू असलेल्या व्यवहारांचा तपशील जमा केला. त्यावेळी दहा जणांच्या खात्यातून हे व्यवहार सुरू असल्याचे आढळून आले. यापैकी पाच खातेदारांची पोलिसांना ओळख पटली. हे पाचही जण डोंबिवली आणि कल्याणमधील होते. विशेष म्हणजे या पाचमधील दोन जण चालक तर तीन जण लोडरचे काम करायचे. मात्र बँकेत देण्यात आलेल्या माहितीनुसार ते विविध इंटरनॅशनल कंपन्यांचे मालक असल्याचे दाखवण्यात आले होते.


मालकांनाच पत्ता नव्हता मालकीच्या कंपनीचा!

पोलिसांनी या मजुरांच्या घरी जाऊन चौकशी केली. तुम्ही अमुक मल्टिनॅशनल कंपन्यांचे मालक आहात असं पोलिसांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी या प्रकरणाची पार्श्वभूमी मजुरांना समजावून सांगितल्यानंतर आणि अटक आरोपीचं नाव सांगितल्यानंतर मजुरांना आपली झालेली फसवणूक लक्षात आली.


सुधीर मजुरांच्या कंपन्यांचं करायचा काय?

अटक आरोपी सुनिल चौधरीने या मजुरांकडून विविध कामे करून देण्याच्या बहाण्याने फॉर्मवर सह्या घेतल्या होत्या. मजूर आणि चालकांनीही न बघताच सह्या केल्या. मात्र, प्रकरण पुढे आल्यानंतर त्या सह्या मजुरांनी बँकेच्या फॉर्मवर घेतल्याचे उघड झाले. सुधीरने बँकेत या मजुरांच्या नावाने खाते उघडून फॉर्ममध्ये कुणाला वेस्टर्न इंटरनॅशनल कंपनीचे मालक, कुणाला मेट्रो, कुणाला कोहिनूर तर कुणाला पोमया कंपनीचे मालक दाखवून बनावट कागदपत्र दिली होती. या खात्यांच्या मदतीने कस्टमचे इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवहाराचे लायसन्स मिळवून ते सुधीर दुसऱ्यांना विकत होता.


आरोपीला ३ दिवसांची पोलिस कोठडी

पोलिसांनी सुधीरवर भायखळा पोलिस ठाण्यात भादविच्या कलम 420, 465, 468, 471, 474, आणि 34 नुसार दुसरा गुन्हा नोंदवून अटक केली आहे. न्यायालयाने सुधीरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक प्रशांत राजे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कदम आणि पोलिस उपनिरीक्षक मोरे यांनी दिली.



हेही वाचा

'पोकर गेम'च्या संचालकाला धमकावणारा अटकेत


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा