सचिन सावंत यांची हत्या पूर्ववैमनस्यातूनच


सचिन सावंत यांची हत्या पूर्ववैमनस्यातूनच
SHARES

मालाडच्या कुरार व्हिलेजमधील शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (46) यांची हत्या पूर्ववैमनस्यातूनच झाल्याचं आता आरोपींच्या चौकशीतून पुढे आलं आहे. सावंत यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. लोकेश देवेंद्र सिंग, अभय उर्फ बारक्या किसन पाटील, सत्येंद्र उर्फ सोनू रामजी पाल, निलेश रमाशंकर शर्मा, ब्रिजेश उर्फ ब्रिजा नथुराम पटेल, अमित निरंजन सिंह, ब्रिजेश प्रकाश सिंह अशी आरोपींची नावे आहेत. पूर्ववैमनस्य आणि एसआरए प्रोजेक्टच्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याची कबुली या सर्व आरोपींनी दिली आहे.


का केली हत्या?


मालाडमधील अप्पापाडा येथील सचिन सावंत शिवसेनेच्या शाखा क्रमांक ३९ चे माजी उपशाखाप्रमुख होते. सचिन यांच्यासोबत कायम निलेश काम करायचा. मात्र कामाच्या मोबदल्यात सचिन निलेशला पैसे आणि चांगली वागणूकही देत नसल्याने निलेश सचिनपा यांच्यापासून दुरावला होता. त्याच बरोबर दुर्गानगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए प्रकल्पावरून ब्रिजेश पटेल याचे सचिन यांच्यासोबत फाटलं होतं. याच वादातून दोघांनी १० लाख रुपये देऊन सचिन यांचा काटा काढण्याचा कट रचला.

मारेकऱ्यांसोबतही त्या दोघांनी कांदिवलीच्या आप्पापाडा परिसरात दोन मिटिंग केल्या, तर काही आरोपींना विरार येथे घर आणि एसआरए कामात हिस्सा देण्याचं आमीषही दाखवलं. दरम्यान २३ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सावंत मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना आकुर्ली रोडवरून गोकुळनगरात पोहोचले असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी सावंत यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढला. या गोळीबारात दोन गोळ्या सावंत यांना लागल्यानंतर स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी सावंत यांना मृत घोषित केलं.


तिसरी घटना

उत्तर मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात येण्याची ही तिसरी घटना आहे. या पूर्वी कांदिवलीच्या समतानगर परिसरात राहणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि बोरिवलीचे उपविभागप्रमुख अशोक सावंत यांची देखील अशा प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर २०१५ मध्ये शिवसेनेच्या चित्रपटसृष्टीतील सचिव राजू शिंदे यांची कंत्राट मिळण्याच्या वादातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा