पत्नीची हत्या करून मृतदेह पिशवीत कोंबणाऱ्या नवऱ्याला अटक


पत्नीची हत्या करून मृतदेह पिशवीत कोंबणाऱ्या नवऱ्याला अटक
SHARES

जुहू चौपाटीवर पिशवीत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं प्रकरण अवघ्या काही तासांत पोलिसांनी सोडवलं असून या प्रकरणी महिलेच्या नवऱ्यालाच अटक केली आहे. सतत होणाऱ्या घरगुती भांडणातून या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह पिशवीत कोंबून त्यांनतर समुद्रात फेकल्याची कबुली नवऱ्याने दिल्याचं समजतंय.

शाकुंतला शर्मा (३७) आणि प्रभूप्रसाद साहा (३८) यांचं सप्टेंबर २०१५ ला लग्न झालं होतं. नेपाळी असलेल्या साहाचं याआधी देखील लग्न झालं असून, त्याला तीन मुलं देखील आहेत. शकुंतलाशी लग्न करताना साहाने तिला अनेक आमिषं दाखवली होती. मात्र, लग्नानंतर दोन बायकांना सांभाळणे त्याला जड जाऊ लागले. त्यातच शकुंतलाच्या चारित्र्यावरून दोघांमध्ये वरचेवर खटके उडत असत.

मंगळवारी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात साहाने शकुंतलाची हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्यानंतर त्याने नायलॉनच्या एका पिशवीत शकुंतलाचा मृतदेह कोंबला आणि मिल्लत नगर येथील खाडीत फेकून दिला.


ओखी वादळामुळे सापडला मृतदेह!

मंगळवारपासूनच ओखी वादळामुळे समुद्र चांगलाच खवळलेला होता. खाडीला देखील पाणी चढले होते. मंगळवारी रात्री साहाने मृतदेह खाडीत फेकला असता, अवघ्या काही तासांत मृतदेह जुहू कोळीवाड्याच्या किनाऱ्यावर आला. किनाऱ्यावर ज्यावेळी शकुंतलाचा मृतदेह सापडला, तेव्हा तो चांगल्या स्थितीत असल्याने शकुंतलाचा चेहरा आणि अंगावरील टॅटू स्पष्ट दिसत होता. जर मृतदेह किनार्याला लागण्यास उशीर झाला असता, तर मृतदेहाची ओळख पटवणं अवघड झालं असतं, असं पोलिसांनी सांगितलं.


टॅटूने लावला छडा!

शाकुंतलाच्या पाठीवर एका रडणाऱ्या परीचा टॅटू होता. हा टॅटू पोलिसांनी आपल्या खबऱ्यांच्या नेटवर्कमध्ये पाठवला आणि अवघ्या काही तासांतच शकुंतलाची ओळख पटली. ओळख पटल्यानंतर तिच्या नवऱ्याला पकडणं पोलिसांना अवघड नव्हतं. या प्रकरणी आम्ही महिलेच्या पतीला अटक केली असून शुक्रवारी त्याला कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती संताक्रूझ विभागाचे साहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांनी दिली.हेही वाचा

कॅन्सर पीडितांना मदत करण्याच्या बहाण्याने महिलेला लाखोंचा गंडा!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा