गणेशोत्सव: गणरायाचं उत्साहात आगमन, मुंबईत कडेकोट बंदोबस्त

१२०० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

गणेशोत्सव: गणरायाचं उत्साहात आगमन, मुंबईत कडेकोट बंदोबस्त
SHARES

विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन सोमवारी मोठ्या उत्साहात झालं. शहरात कायदा व सुव्यवस्थेता प्रश्न उद्भवू नये यासाठी शहरात पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. १२०० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

वाहतुकीचं नियोजन

वाहतूक पोलिसांनीही आपला अॅक्शन प्लान तयार केला आहे. मुंबईत ७६१० सार्वजनिक गणपती मंडळ असून काही नामकिंत मडळांच्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या ठिकाणी गर्दीच्या फायदा घेऊन समाजकंटकांनी घातपात घडवू नये, याकरता मुंबई पोलिसांनी ४४ हजाराचा फौज फाटा तैनात ठेवण्यात आला आहे. शिवाय महत्वाच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस असणार आहेत. शहरात बसवण्यात आलेल्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवलं जाणार असून स्थानिक मंडळांना पोलिस दिवसाकाठी ३ ते ४ वेळा भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. सुरक्षेत्या दृष्टीकोनातून स्थानिक मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याविषयीचे आदेश देण्यात आलेत. तसंच जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.


स्पेशल स्काॅड

गर्दीच्या ठिकाणी अल्पवयी मुले व महिलाच्या सुरक्षेसाठी स्पेशल स्काॅड तैनात राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार होऊ नयेत. यासाठी २०० हून अधिक महिला पोलिसही गणोशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. यासह ६ राज्य राखीव दल आणि पॅरामिलेटरी फोर्स, ३ हजार ६०० वाहतूक पोलिस, सशस्त्र दलाचे १०० जवान आणि हॅम रेडिओचे ३५ स्वयंमसेवक असा भरक्कम पोलिस आणि एनजीओंचा मोठा बंदोबस्त मुंबईत गणेशोत्सव काळात असणार आहे. त्यासह पोलिसांच्या मदतीला ट्रेनी पोलिस, होमगार्डचे जवान, नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक, नागरी सरंक्षण दलाचे जवान, एनएसएसचे  विद्यार्थी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी असणार आहेत.

लालबागच्या राजासाठी वाढीव कुमक

गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाला होणारी गर्दी लक्षात घेता. मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी एक विशेष कंमाड कंट्रोल सेंटर उभारण्यात आलं आहे. तसंच राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी १ अतिरिक्त सह पोलिस आयुक्त, १२ पोलिस उपायुक्त, २०० पोलिस निरीक्षक, ८०० कर्मचारी, १ एसआरपीएफ, २ सीसीटिव्ही व्हॅन, काेम्बिंग आॅपरेशन पथक, प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, हँड डिटेक्टर सह १२०० जणांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

संबंधित विषय