तेल तस्कर राजू पंडितवर मकोका; तेल माफियांचे धाबे दणाणले

सप्टेंबर महिन्यात पोलिस गणपतीच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याने मुंबईच्या समुद्रात एक मोठं जहाज तेल तस्करी करण्यास येणार होतं. देशात तेलाच्या वाढत्या किंमतींचा फायदा घेऊन तस्करांनी पोलिसांची नजर चुकवून तेल तस्करी करण्याचं ठरवलं होतं.

तेल तस्कर राजू पंडितवर मकोका; तेल माफियांचे धाबे दणाणले
SHARES

 मुंबईच्या समुद्रात आपल्या हस्तकांच्या मदतीने तेल तस्करी करणाऱ्या कुख्यात तेल माफिया राजू पंडितवर पोर्ट झोन पोलिसांनी आता मकोका (संघटीत गुन्हेगारी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे तेल माफियांचे धाबे दणाणले असून परिसरातील सर्व अवैध धंद्यांना लगाम लावण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. 


उपायुक्तांची कारवाई

मुंबईच्या समुद्रात कोट्यवधींची तेल तस्करी करताना तेल माफिया राजू पंडितसह दोघांना काही दिवसांपूर्वी पोर्ट झोनच्या यलोगेट पोलिसांनी अटक केली होती. देशात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतींनी उच्चांक गाठल्याने समुद्रात तेलाची तस्करी करणाऱ्या या बड्या माफियांनी पुन्हा तोंड वर काढण्यास सुरूवात केली होती. याची महिती पोर्ट झोनच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी हे अवैध धंदे करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. त्यानंतर या सराईत टोळ्यांनी मुंबईबाहेर तेल तस्करी सुरू करण्यास सुरूवात केली.


बंदोबस्ताचा घेतला फायदा

 सप्टेंबर महिन्यात पोलिस गणपतीच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याने मुंबईच्या समुद्रात एक मोठं जहाज तेल तस्करी करण्यास येणार होतं. देशात तेलाच्या वाढत्या किंमतींचा फायदा घेऊन तस्करांनी पोलिसांची नजर चुकवून तेल तस्करी करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार गौरी-गणपती विसर्जनावेळेस पोलिस बंदोबस्तात व्यस्त असताना ही टोळी समुद्रातून शेकडो लिटर तेल चोरी करत होती. गस्तीवर असलेल्या यलोगेट पोलिसांना लकडाबंदर जवळील समुद्रात सोमवार १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.४५ वाजता एक संशयीत बोट आढळून आली. या बोटीची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांना  ७० लिटर डिझेल आढळून आलं.


रेकाॅर्डिंगवरून शोध

चौकशीनंतर पोलिसांनी या बोटीवर काम करणारे सोनू उर्फ जलील कुरेशी, मोहम्मद अन्सारीसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. या तिघांकडे केलेल्या चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. मात्र, या गुन्ह्यातील मास्टर माईंडची माहिती देण्यासाठी ते तोंड उघडत नव्हते. सोनूचा मोबाइल तपासल्यावर त्यातही संशयास्पद आढळून आलं नाही. मात्र, मोबाइलमध्ये सोनूच्या नकळत काही फोनचे रेकाॅर्डिंग झाले होते. त्या रेकाॅर्डिंगमध्ये सोनूला कुख्यात तेल माफिया राजू पंडित या तस्करीबाबत मार्गदर्शन करत असल्याचं उघडकीस आलं.  चौकशीत राजू पंडितचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.


डिझेल प्रति लिटर ५५ रु.

राजू पंडितच्या अटकेनंतर सर्व तस्करांचे धाबे दणाणले आहेत. समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या बोटींना, खासगी टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्यांना ही टोळी बाजारभावापेक्षा कमी किंमतीत म्हणजेच ५५ रुपये लिटरने डिझेल आणि पेट्रोल ६५ रुपये लिटर या भावाने विकत होते. मुंबईच्या समुद्रात बाहेरून येणाऱ्या जहाजांच्या कॅप्टनला गाठून ही तस्करी केली जायची. यातून ही टोळी दिवसाला लाखो रुपये कमवायची. महिन्याची त्यांची कमाई कोट्यावधी रुपयांत होती. 


५ गंभीर गुन्हे 

राजूवर या पूर्वीही तेल तस्करीचे ५ गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मात्र, या गुन्ह्यात पहिल्यांदाच त्याला पोलिसांकडून अटक झाल्याने इतर तस्करांचे धाबे दणाणले आहेत. राजूच्या संघटीत गुन्हेगारीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते. अाधीचे गुन्हे लक्षात घेऊन त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  



हेही वाचा - 

खासदार हुसेन दलवाई यांना लुबाडणारे अटकेत

रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक

माॅडेलचा पोलिसांसमोर धिंगाणा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा