पोस्टात आपली आयुष्यभराची कमाई गुंतवणाऱ्या माहीमकरांची सध्या झोप उडाली आहे. यामागचं कारण म्हणजे इथल्या मोरी रोड पाेस्ट ऑफिसमध्ये एका मोठा घोटाळा समोर आला आहे. त्यात ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. या घोटाळ्याची व्याप्तीही दिवसेंदिवस वाढत चालली असून पोस्टाकडून आतापर्यंत ३८०० खातेधारकांना ७ हजार पत्र पाठविण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसच्या एका अधिकृत एजंटने ठेवींच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले, मात्र हे पैसे पोस्टात न गुंतवता या पैशांचा दुरूपयोग करून ग्राहकांची फसवणूक केली.
या प्रकरणी एका खातेदार महिलेच्या तक्रारीवरून माहीम पोलीस ठाण्यात पोस्ट ऑफिस एजंट रमेश भट, त्याची पत्नी योगिता भट आणि मुलगी भूमिका भट या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच हे त्रिकुट फरार झालं आहे.
आरोपीने पोस्टात पैसे गुंतवतो असे सांगून खातेधारकांकडून पैसे घेतले. परंतु प्रत्यक्षात हे पैसे पोस्टात न गुंतवता इतरत्र वापरल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आम्ही तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ४० लोकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहे.
- मिलिंद इडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माहीम पोलीस ठाणे
पोस्ट ऑफिस एजंट म्हणून रमेश भट हा माहीमच्या मोरी रोड पोस्ट ऑफिस शाखेशी अनेक वर्षांपासून संलग्न आहे. त्याच्या जोडीला त्याची मुलगी देखील पोस्टाची कामे करत असे, गेल्या कित्येक वर्षांपासून एजंटचं काम करणाऱ्या भटवर शेकडो लोकांनी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्याच्या हाती आयुष्यभराची जमापुंजी ठेवली. ज्या पद्धतीनं भटनं गुंतवणूकदारांची फसवणूक केलीय, त्यावरून या घोटाळ्यात पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा देखील हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
खाजगी शिकवणी घेऊन घर चालवणाऱ्या आशा मंडलिक (५३) यांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. कारण त्यांनी मोठ्या विश्वासानं रमेश भटकडे पोस्टात ठेवी ठेण्यासाठी तब्बल २६ लाख रुपये दिले होते. या पैशांचं भटने नेमकं काय केलं हे त्यालाच ठाऊक.
२०११ साली त्यांनी भट मार्फत पोस्टात ६ लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले. ही मुदत ठेव २०१७ साली मॅच्युअर होणार होती. दरम्यानच्या काळात मंडलिक यांनी भटला २६ लाख रुपये पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतविण्यासाठी दिले. त्याचं व्याज त्यांना २०१५ पर्यंत नियमित स्वरूपात मिळत असे. पण नंतर व्याज मिळणं बंद झालं. व्याजाबद्दल विचारणा केल्यावर भट टाळाटाळ करू लागला.
एप्रिल महिन्यात मंडलिक यांनी गुंतवलेली ६ लाख रुपयांची मुदत ठेव मॅच्युअर झाली. तेव्हा मंडलिक यांनी भटशी संपर्क केला. त्यानुसार भट याने मंडलिक यांना ७ लाख ८४ हजारांचा खाजगी बॅंकेचा चेक दिला. मात्र हा चेक बॅंकेत टाकल्यावर खात्यात पुरेसे पैसे नसल्याने बाऊन्स झाला.
मंडलिक यांना संशय आल्यावर त्यांनी पोस्टात चौकशी केली. तेव्हा त्यांच्या नावे पोस्टात केवळ ३ हजार रुपयेच असल्याचं ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी फसवणूक झालेल्या ठेवीदारांचा आकडा शेकडोंच्या घरात आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये माहीमचे सचिन वैद्य देखील असून त्यांच्या तब्बल ३० लाखांच्या ठेवी गहाळ झाल्याचं समोर आलं आहे.
यासंदर्भात सचिन वैद्य म्हणाले, माझ्या आधी माझ्या आई वडिलांनी रमेश भटमार्फत पोस्टात पैसे गुंतवले होते. १९९८ पासून आम्ही त्याच्यामार्फत पैसे गुंतवत होतो. यादरम्यान ज्या ठेवी मॅच्युअर होत होत्या त्या देखील आम्ही पुन्हा पोस्टातच गुंतवत होतो. याकाळात आम्ही कधी पोस्टात गेलो तर पोस्टाचे कर्मचारी आम्हाला भटकडेच पाठवत. त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत भट फसवत असल्याचं समजलं नाही.
मोरी रोड येथील शाखेत मी माझी बहिण, आई वडील आणि इतर कुटुंबीयांची मिळून २६ खाती होती. त्यात २९ लाख ३० हजारांच्या ठेवी होत्या. घोटाळा समोर आल्यानंतर पोस्टाने खातेधारकांना पत्र पाठवण्यास सुरूवात केली, तेव्हा आमच्या नावे असलेल्या चार खात्यामध्ये केवळ ६८ हजार रुपये असल्याचं कळालं. आमच्या २६ खात्यातील २९ लाख रुपये कुठे गेले ? असा प्रश्न आहे.
मोरी रोड पोस्ट ऑफिसचे सहाय्यक पोस्ट मास्टर जनरल यांनी या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया मुंबई लाइव्हला दिली.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)