प्रताप सरनाईकांनी ‘इतके’ पैसे लाटले, ईडीचा दावा

अमित चांडोळे यांना ईडीने १२ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. चांडोळे प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रताप सरनाईकांनी ‘इतके’ पैसे लाटले, ईडीचा दावा
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ला सुरक्षा व्यवस्था पुरवण्याच्या कामात झालेल्या घोटाळ्यातील एकूण रकमेपैकी ७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम शिवसेना आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी लाटल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात केला आहे. आतापर्यंत नोंदविलेल्या जबाबातून ही माहिती समोर आल्याचं ईडीने नमूद केलं आहे.  

२०१४- १५ मध्ये  टॉप्स ग्रुप सर्विस अँड सोल्यूशन कंपनीला एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पाच्या ठिकाणी महिन्याला ३०० ते ३५० सुरक्षा रक्षक पुरविण्याचं १७५ कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं. परंतु एकूण मनुष्यबळापैकी अवघे ७० टक्के सुरक्षा रक्षकच तैनात करून कंपनी पूर्ण कामाचे पैसे घेत होती. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पीएफ आणि ईएसआयसीचाही लाभ कंपनी लाटत होती. 

हेही वाचा- मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळेंना अटक

टॉप्स ग्रुपचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज बिजलानी यांनी कंपनीच्या खात्यातून मोठी रक्कम काढली होती. तर संकेत मोरे आणि अमित चांडोळेहे एजंट बनावट कागदपत्रे बनवून पैसे काढत. या रकमेतील ५० टक्के रक्कम कमिशन म्हणून त्यांना मिळायची, अशी माहिती समोर आली आहे.

यापैकी अमित चांडोळे यांना ईडीने १२ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. चांडोळे प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याआधी ईडीनं मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचं घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीनं ५ तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, आपण परदेशातून आल्यानं ८ दिवस आपल्याला सक्तीनं क्वॉरंटाईन राहावं लागत आहे, असं त्यांनी ईडीला कळवलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा