Advertisement

मी बोलतच राहणार, प्रताप सरनाईकांचं आव्हान

माझ्यावर कितीही कारवाई करा, चौकशी करा मी बोलत राहणार आणि पक्षाने दिलेली जबाबदारी देखील निभावत राहणार, असं खुलं आव्हान शिवसेना प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे.

मी बोलतच राहणार, प्रताप सरनाईकांचं आव्हान
SHARES

मी मागच्या काही दिवसांमध्ये जे विषय लावून धरले, त्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप नेत्यांच्या आकसातून आणि केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच माझ्यावर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. परंतु माझ्यावर कितीही कारवाई करा, चौकशी करा मी बोलत राहणार आणि पक्षाने दिलेली जबाबदारी देखील निभावत राहणार, असं खुलं आव्हान शिवसेना प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे.

प्रताप सरनाईक यांचं घर आणि कार्यालय अशा १० ठिकाणी अंमलबजावणी संचलनालया (ईडी) च्या पथकाने मंगळवारी सकाळी छापे मारले. टॉप्स कंपनी समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीने स्पष्ट केलं.  ईडीने सरनाईक यांचे चिरंजीव विहंग यांची जवळपास ६तास चौकशी केली. तसंच प्रताप सरनाईक यांना समन्स बजावत चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं.

हेही वाचा - सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी ईडीला देईन, मग बघूया कुणाची चौकशी होते- संजय राऊत

या कारवाईनंतर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रताप सरनाईक म्हणाले, मागील काही दिवसांमध्ये कंगणा रणौत, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मी विधानसभेत आवाज उठवला, हक्कभंग आणला, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास पुन्हा होण्यासाठी पाठपुरावा केला, यामुळे अडचणीत आलेल्या भाजपकडून आकसापोटीच माझ्यावर ही कारवाई होत आहे. अशी कारवाई होईल, हे मला आधीपासूनच अपेक्षित होतं, असा दावा प्रताप सरनाईक यांनी केला.

माझ्या तसंच मुलांच्या घरी आणि ऑफिसात गेल्यानंतर ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता केला. जेवण केलं. चार- पाच वेळा चहा देखील घेतला. ईडीच्या लोकांचं माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी चांगलं स्वागत केलं. घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसं करायचं हे सरनाईक कुटुंबाला चांगलं माहीत आहे. 

ईडीचे अधिकारी माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते. मात्र देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जी प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे, ती जबाबदारी मी पार पाडणार, मग माझी कितीही चौकशी करा मी बोलतच राहणार, असं आव्हान देखील प्रताप सरनाईक यांनी दिलं.

दरम्यान, प्रताप सरनाईक हे परदेशातून परतले असल्यानं विलगीकरणात आहेत. त्यामुळे चौकशीसाठी पुढील आठवड्यात बोलावण्यात यावं अशी विनंती सरनाईक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती समोर आली आहे.

(shiv sena mla and spokesperson pratap sarnaik targets bjp after ed raid)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा