'डॅडी'नंतर 'मम्मी' पोलिसांच्या रडारवर!

तुरूंगात राहूनही कुख्यात डॉन अरूण गवळी उर्फ डॅडी दहशत कायम असल्याचं किंबहुना मुंबईबाहेरही पसरत असल्याचं एका ताज्या प्रकरणावरुन पुढं आलं आहे. पुण्यातील व्यावसायिकांना गवळी गँगकडून लक्ष्य केलं जात असून खंडणीच्या एका गुन्ह्यात गवळी गँगचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

'डॅडी'नंतर 'मम्मी' पोलिसांच्या रडारवर!
SHARES

शिवसेना नगरसेवकाची हत्या केल्याप्रकरणी कुख्यात डॉन अरूण गवळी उर्फ डॅडी तुरूंगात गेल्यावर 'डॅडी'चं साम्राज्य संपल्याचं भाकीत अनेकांनी वर्तवलं. मात्र तुरूंगात राहूनही 'डॅडी'ची दहशत कायम असल्याचं किंबहुना मुंबईबाहेरही पसरत असल्याचं एका ताज्या प्रकरणावरुन पुढं आलं आहे. पुण्यातील व्यावसायिकांना गवळी गँगकडून लक्ष्य केलं जात असून खंडणीच्या एका गुन्ह्यात गवळी गँगचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी गवळीची पत्नी आशा गवळी उर्फ मम्मी यांना पुण्याच्या मंचर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.


काय आहे मंचर प्रकरण?

पुण्याच्या मंचर भागातील एका व्यावसायिकाला काही दिवसांपासून गवळी गँगकडून ५ लाखांच्या खंडणीसाठी फोन आणि मेसेज येत होते. एका व्यावसायिकाने तर त्याच्या वागजोली येथील कार्यालयात तिघांनी येऊन धमकावल्याची तक्रारही मंचर पोलिस ठाण्यात नोंदवली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी त्याला दिली जात होती. या प्रकरणी व्यावसायिकाने गुन्हा नोंदवल्यानंतर हा गुन्हा अधिक तपासासाठी पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.


तिघा आरोपींचं कनेक्शन

या गुन्ह्यात पोलिसांनी गवळी गँगच्या मोबिन मोहम्मद मुजावर, सूरज राजेश यादव आणि बाळा सुदान पाठारे या तिघांना अटक केली. या तिघांपैकी मोबिन हा भायखळाच्या दगडी चाळीतील रहिवासी आहे. सूरज आशा गवळी यांच्या पुण्यातील वडगाव पीर येथील फार्महाऊसवर कामाला आहे. तर बाळा पाठारे हा पुण्यातील आखिल भारतीय सेनेचा युवा पदाधिकारी आहे.


आधीही झाली होती अटक

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी २००८ मध्ये या तिघांना अटक केली होती. २०१० मध्ये यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हाही नोंदवण्यात आला होता. मंचर पोलिसांनी ठाण्यात तक्रार नोंदवताना या तिघांव्यतीरिक्त अन्य दोन व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.


तपासाचा मोर्चा वळवला

त्या दोघांपैकी एक महिला आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे. हे तिन्ही आरोपी आशा गवळी यांच्या संपर्कात असल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी आशा गवळी यांच्यावर तपासाचा मोर्चा वळवला आहे.


बजावली नोटीस

पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांशी पत्रव्यवहार करून आशा गवळी यांना हजर राहण्याबाबत नोटीस पाठवण्यासंबधी कळवलं. त्यानुसार आग्रीपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी आशा गवळी यांना पोलिस ठाण्यात बोलवून त्यांना ४१1(अ)(१) सीआरपीसी नुसार नोटीस बजावली. या नोटीशीत पुण्यातील स्थानिक गुन्हे शाखेने कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याबाबत कळवल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली.



हेही वाचा-

मालाडमध्ये सेना उपशाखाप्रमुखाची गोळ्या घालून हत्या

लाईट बंद न केल्याने पत्नीची केली हत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा