किरण गोसावीविरोधात लूकआऊट नोटीस जारी

पुणे पोलिसांनी किरण गोसावी याच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

किरण गोसावीविरोधात लूकआऊट नोटीस जारी
SHARES

पुणे पोलिसांनी (Pune Police) किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्या विरोधात लूकआऊट (Lookout Notice) नोटीस जारी केली आहे. किरण गोसावी हा मुंबईतल्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातला साक्षीदार आहे.

गोसावी हा पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आरोपी आहे. त्यामुळे तो भारताबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्यानं त्याच्या विरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली आहे.

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेमुळे किरण गोसावी चर्चेत आला. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे किरण गोसावी कोंडीत अडकला. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओत गोसावी आर्यन खानला घेऊन जाताना दिसला. आर्यनसोबत काढलेला गोसावीचा सेल्फीही व्हायरल झाला.

फरासखाना पोलीस ठाण्यात गोसावीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचं पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितलं. २०१८ मध्ये गोसावीवर पुण्यात फरासखान पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातल्या एका तरुणानं तक्रार दाखल केली होती.

२०१८ मध्ये गोसावी यानं आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणानं प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीनं त्याला मलेशियाला पाठवलं.

मात्र, तिथं नोकरी न मिळाल्यानं तो भारतात परत आला. त्यानंतर त्यानं फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार आहे. त्यामुळे आता या फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस सध्या किरण गोसावी याचा शोध घेत आहेत.

फिर्यादी चिन्मय देशमुख यानं सांगितलं, किरण गोसावी यानं आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश इथल्या अनेकांनी नोकरीच्या आमिषानं फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्यानं फसवलं आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर आहेत.

दरम्यान आर्यन खानच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत, एनसीबीनं न्यायालयात आपली बाजू मांडली.

एनसीबीनं न्यायालयाला सांगितलं की, जरी आर्यन खानकडून बंदी घातलेला पदार्थ जप्त केला नसला तरी तो एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. एनसीबीनं न्यायालयाला असंही सांगितलं की, आर्यन खानवर प्रतिबंधित पदार्थ वापरल्याचा आरोप आहे. तो बंदी असलेला पदार्थ अरबाज मर्चंटकडून जप्त करण्यात आला आहे.हेही वाचा

आर्यन खान प्रकरणातील साक्षिदारावरच फसवणुकिचे गुन्हे दाखल

ड्रग्स प्रकरण : आर्यन खानआधी ‘या’ कलाकारांचीही झाली होती चौकशी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा