कुर्ला - जर तुम्ही रिझर्व्हेशन तिकीट रद्द करण्यासाठी तिकीट काउंटरवर पोहचलात आणि तुम्हाला कॅन्सलेशन फॉर्म भरता येत नसेल तर कोणाकडूनही मदत घेण्याआधी थोडा विचार करा. ती कदाचित तिकीट हेराफेरी करणाऱ्या एका टोळीतली व्यक्ती असू शकते. जी तुमच्याकडून तुमची पूर्ण माहिती अगदी सहज काढून घेऊ शकते. संजीव बजाज नावाच्या एका व्यक्तीने अशा प्रकारची हेराफेरी करण्यात जणू काही पदवीच मिळवलीय. या टोळीने अशा प्रकारे भरपूर जणांना फसवलंय. असाच एक प्रकार कुर्ला प्लॅटफॉर्मवर घडलाय. आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. बजाज आणि त्याची टोळी अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या लोकांकडून कॅन्सलेशन फॉर्मच्या नावाखाली एक्सचेंजचा फॉर्म भरुन त्यांच्याकडून पैसे उकळतात. बजाजच्या जाळ्यात अडकलेल्या एका व्यक्तीने याप्रकरणी कुर्ला जीआरपीमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरपीएफ अधिकाऱ्यांनी या टोळीला अटक केली.