लोकलमधील बॅग चोराने सुरक्षारक्षकालाच बनवलं चोर!

लोकलमधील चोराच्या प्रतापामुळे एका सज्जन व्यक्तीला चक्क आपलं 'शील' गमवावं लागलं. खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेला हा इसम पैसे कमावण्याच्या हव्यासातून स्वत:च लोकल ट्रेनमध्ये बॅगचोरी करू लागला. या इसमाला रेल्वे पोलिसांनी नुकतीच खार रेल्वे स्थानकावर अटक केली.

लोकलमधील बॅग चोराने सुरक्षारक्षकालाच बनवलं चोर!
SHARES

लोकल ट्रेनच्या गर्दीत अनेकजण चुकून आपलं सामान, बॅग विसरतात, तर काही वेळेस चोर या सामानांवर 'हात साफ' करतात. चोरांच्या या 'हात सफाई'मुळे अनेकांना आपल्या मौल्यवान वस्तूंना मुकावं लागतं. पण लोकलमधील चोराच्या प्रतापामुळे एका सज्जन व्यक्तीला चक्क आपलं 'शील' गमवावं लागलं. खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेला हा इसम पैसे कमावण्याच्या हव्यासातून स्वत:च लोकल ट्रेनमध्ये बॅगचोरी करू लागला. या इसमाला रेल्वे पोलिसांनी नुकतीच खार रेल्वे स्थानकावर अटक केली असून त्याच्या चौकशीतून हे विदारक सत्य समोर आलं. प्रशांत संपतराव कांबळे (३३) असं त्याचं नाव आहे.

रेल्वे पोलिसांच्या वांद्रे युनिटने प्रशांत कांबळेला सांताक्रूज रेल्वे स्थानकावर संशयास्पदरित्या फिरताना पाहिलं आणि त्याचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमधील फर्स्ट क्लासच्या डब्यात एका प्रवाशाची बॅग चोरताना पोलिसांनी त्याला खार रोड स्थानकात रंगेहात पकडलं.


कहानी ऐकून पोलिसही थक्क

पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आणि इतर गुन्ह्यांत देखील त्याचा सहभाग आहे का? याचा तपास घेण्यासाठी त्याची चौकशी सुरु केली. त्यावेळी अटकेत असलेल्या प्रशांतने आपण ही चोरी कधीपासून आणि का? करू लागलो हे सांगितल्यानंतर त्याची कहानी ऐकून पोलिस थक्कच झाले.


'असा' वळला चोरीकडे

एकेकाळी सॅँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेला प्रशांत डिसेंबर २०१७ मध्ये कामावरून लोकलने कांदिवलीला घरी परतत होता. त्यावेळी एका चोरट्याने प्रशांतची बॅग अदलाबदल करून चोरून नेली.

स्थानक आल्यावर बॅग घेऊन उतरण्याच्या तयारीत असलेल्या प्रशांतला भुरट्या चोराने आपली बॅग बदलल्याचं लक्षात आलं. चोरांनी प्रशांतसाठी सोडलेल्या बॅगेत रद्दी भरून ठेवली होती. याच अनाहूतपणे घडलेल्या प्रसंगातून प्रशांत चोरीकडे वळला. मेहनतीची नोकरी करून तुटपुंज्या पैशांत घर चालण्यापेक्षा चोरी करून झटपट श्रीमंत होण्यासाठी प्रशांतने देखील प्रवाशांच्या बॅगांची अदलाबदल करून लोकलमध्ये चोरी करण्यास सुरूवात केली.


चोरीची कबुली

शक्यतो लॅपटाॅप घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रशांत लक्ष्य करत असल्याचं त्याने सांगितलं. मागील वर्षभरापासून प्रशांत मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये चोरी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. एवढंच नव्हे, तर वांद्रे स्थानकावर ४ आणि अंधेरी स्थानकावर १ चोरी केल्याची कबुलीही त्याने दिली. चोरलेल्या बँगेतून मिळालेले लॅपटाॅप प्रशांतने ज्या दुकानदारांना विकले, त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.



हेही वाचा-

साहेब ओरडतील म्हणून... अग्निशमन दलाचा वाहनचालक 'नो एण्ट्री'त घुसला


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा