गुंगीचं औषध देऊन एक्स्प्रेसमध्ये लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


गुंगीचं औषध देऊन एक्स्प्रेसमध्ये लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांशी ओळख वाढवून त्यांना जेवण किंवा चहातून गुंगीचं औषध देऊन लुटणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बसरात हुसेन (५०) आणि मोहम्मद साफी (३५) अशी या दोघांची नावं असून या दोघांनी उत्तर प्रदेश, बिहार, कोकणमार्गे कर्नाटक, केरळ, तमिळनाडूमध्ये जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेसमध्ये अशा प्रकारे अनेकांना लुटल्याची कबुली दिली आहे. या दोघांकडून पोलिसांनी पावणेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.


रेल्वे पोलिस सतर्क

मुंबईतून परराज्यात निघणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचा विश्वास संपादन करून त्यांना खाद्य पदार्थांमधून गुंगीचं औषध देत लुटणाऱ्या टोळीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच होत्या. याप्रकरणी पनवेल, रत्नागिरी, कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई रेल्वे पोलिसांनी या टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली.


आणि तपास सुरू

५ मे रोजी कुर्ला ते उडुपी रेल्वे स्थानकादरम्यान मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशास याचप्रकारे लुटण्यात आलं होतं. त्यात बिस्किटामध्ये गुंगीचं औषध देऊन सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू चोरण्यात आल्या. त्याचा तपास करताना कल्याण रेल्वे क्राइम ब्रँच युनिट तीन, रेल्वे क्राइम ब्रँच, रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) सहाय्याने तपास सुरू करण्यात आला.


२०० ग्रॅम सोनेही हस्तगत

या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध स्थानकावरील तब्बल ३६० सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून पाहिलेत. त्याच बसरात हुसेन (५०), मोहम्मद साफी (३५) या दोघांची ओळख पटली. या दोघांचा शोध घेत असताना पोलिसांनी त्यांची पार्श्वभूमी शोधून काढत त्यांना पश्चिम बंगालमधून अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी पाच लाख ७७ हजार रुपये मूल्याचे २०० ग्रॅम सोनेही हस्तगत करण्यात यश आले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा