रेल्वे प्रवाशांना लुटणारे चोरटे जेरबंद

कुर्ला रेल्वे टर्मिनल्सवर गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची कायमच वर्दळ असते. त्यामुळे गडबडीत असलेल्या प्रवाशांना पैसे पडले असल्याचं सागत त्यांचं लक्ष विचलीत झाल्यावर सामान चोरणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

रेल्वे प्रवाशांना लुटणारे चोरटे जेरबंद
SHARES

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर विविध शकला लढवून प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी जेरबंद केलं अाहे. कधी पैसे खाली पडले असल्याचं कारण देऊन तर कधी मोबाइल हिसकावून, तर कधी चाकूचा धाक दाखवून हे चोरटे विविध स्थानकांवर नागरिकाना लक्ष्य करायचे.


१३ लाखांचं सोनं लुटलं

कुर्ला रेल्वे टर्मिनल्सवर गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची कायमच वर्दळ असते. त्यामुळे गडबडीत असलेल्या प्रवाशांना पैसे पडले असल्याचं सागत त्यांचं लक्ष विचलीत झाल्यावर सामान चोरणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकारचे गुन्हेही दिवसेंदिवस वाढत होते. ११ जुलै रोजी गावी निघालेल्या दिपा मेहतानी यांना तीन चोरट्यांनी पैसे खाली पडले असल्याचं सांगत त्यांचं लक्ष विचलीत करून बॅग चोरली. या बॅगेत दिपा यांचं १३ लाख रुपयांचं सोनं होतं.


शेकडो सीसीटिव्ही तपासले

 या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपीची ओळख पटवण्यासाठी शेकडो सीसीटिव्ही तपासले. अखेर आरोपींची ओळख पटल्यानंतर ही टोळी वांद्रे टर्मिनल्स येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी सुरेशकुमार पंडूरंगन याला अटक केली. सुरेशच्या चौकशीतून पोलिसांनी त्याचे साथीदार एम. सेथींलकुमार उर्फ महालिंगम, मूर्ती उर्फ नवनीथ कृष्णन यांना अटक केली. या चोरट्यांकडून चोरीचा ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला अाहे.


रेल्वे ट्रॅकजवळ लूट

दुसरीकडे विक्रोळीत रेल्वे ट्रॅक शेजारील अंधाराचा फायदा घेऊन प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या विक्की कुंचीकुर्वे व शोहेब अन्वर शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी अशा प्रकारे अनेकांना लुबाडल्याची कबुली दिली आहे. तर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे महागडे मोबाइल आणि पाकिट लंपास करणाऱ्या केतन मेहता यालाही पोलिसांनी कुर्ला येथून रंगेहाथ पकडलं अाहे. केतनजवळून पोलिसांनी ७  तर त्याच्या  घरातून ८ अाणि इतर ठिकाणी लपवलेले २० महागडे मोबाइल हस्तगत केले आहेत. या सर्व मोबाइलची किंमत ४ लाख ६७ हजार रुपये अाहे. या सर्व अारोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.



हेही वाचा -

मानखुर्दमध्ये बेस्ट बस पेटवणाऱ्या तिघांना अटक

वयोमान संपलेली रिक्षा रस्त्यावर, चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा