मोबाईल चोरल्याच्या संशयातून रिक्षा चालकाची हत्या


मोबाईल चोरल्याच्या संशयातून रिक्षा चालकाची हत्या
SHARES

मोबाईल चोरी केल्याच्या संशयातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार साकीनाका परिसरात घडला आहे. कुर्ला येथे राहणारा अमरकुमार लालजी गुप्ता (24) या रिक्षाचालकाची हत्या केल्याच्या गुन्ह्याखाली साकीनाका पोलिसांनी कुर्ला येथे राहणारा दानिश अनिस अहमद शेख (22) आणि विलेपार्लेला राहणारा फिरोझ रफिक शेख(37) या दोन रिक्षाचालकांना अटक केली आहे. 

मंगळवारी 23 मे रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास कुर्ला येथील जरीमरी येथे दानिश शेख याला त्याच्या खिशातून त्या ठिकाणी येत असलेला अमरकुमार मोबाईल चोरत असल्याचा संशय आला. मोबाईल खिशातून गायब झाल्यामुळे त्याने अमरकुमारला पकडले. त्यानंतर त्याने त्याला एका गल्लीत नेवून मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्या ठिकाणावरून अमरकुमार याने पळ काढला.

यावर दानिश याने अमरकुमारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याचा मित्र आणि सह आरोपी फिरोज याच्यासह त्याने छत्रपती शिवाजी एअरपोर्टवर शोध घेतला असता अमरकुमार तिथेच आढळला. त्यांनी त्याला पकडून जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच परिस्थितीमध्ये त्यांनी त्याला झाडाला बांधून त्याची व्हिडिओ क्लिप देखील बनवली. मारहाण केल्यानंतर ते त्याला रिक्षात टाकून साकीनाका येथे आणत असताना अमरकुमारची प्रकृती अधिकच गंभीर झाली. जखमी अवस्थेतच या दोघांनी त्याला सोडून पळ काढला. सकाळी 9 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला एक इसम जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला राजावाडी रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी दानिश अनिस अहमद शेख आणि फिरोझ रफीक शेख या दोघांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा