सचिन वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी

मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सोमवारी खंडणीच्या प्रकरणात न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सचिन वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी
SHARES

मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सोमवारी खंडणीच्या प्रकरणात न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेने त्यांच्या १० दिवसांची कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने या मागणीवर विचार करून, ६ नोव्हेंबरपर्यंत सचिन वाझे यांना गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे.

तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून नजरकैदेत राहण्यासाठी बडतर्फ केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाझेंना नजरकैदेत ठेवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला आहे.

वाझे हा नजरकैदेत ठेवल्यास पळून जाऊ शकतो आणि खटल्यातील साक्षीदारांसदर्भात छेडछाड करू शकतो, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटले होते की सचिन वाझेंवर व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे, त्यामुळे त्यांना नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये.

'जर याचिकाकर्त्या आरोपीला नजरकैद दिली गेली, तर तो न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रातून फरार होईल आणि कथितरित्या त्याचे सहकारी असलेल्या संरक्षित साक्षीदार आणि फिर्यादी साक्षीदारांसदर्भात छेडछाड करेल, अशी सर्व शक्यता आहे. या प्रकरणात साक्षीदार कोण आहेत, याचा शोध घेणं वाझेसाठी अवघड नाही. सध्या साक्षीदारांची ओळख आणि पत्ते सुरक्षित आहेत ठेवण्यात आले आहेत. परंतु वाझेंना मुंबई परिसरातील सर्व माहिती असून तो एक प्रभावशाली व्यक्ती आहे, त्यामुळे अडचणी येऊ शकतात', असे एनआयएने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा