दुचाकीच्या धडकेत मुलीने गमावला पाय

दहिसर (पू.) - वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या जोरदार धडकेमुळे एका शाळकरी मुलीला कायमचं अपंगत्व आलं आहे. दहिसरच्या छत्रपती शिवाजी रोडवर काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. फामिदा शेख असं त्या मुलीचं नाव आहे. त्यावेळी जखमी अवस्थेत असलेल्या फामिदाला जवळच्याच अशोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यानंतर तिला नवनीत रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने इन्फेक्शन संपूर्ण शरीरात पसरत असल्याने डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यासाठी पाय कापावा लागला. मात्र पोलिसांना आरोपीला अटक करण्यात अजूनही यश आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार 9 जानेवारीला दुपारी 2 वाजेच्या दरम्यान दहिसर (पू.) सावेनगर थॉमस कंपाउंड इथे राहणारी फामिदा शेख (12) शाळेत जात होती. सानेनगर इथून रोड क्रॉस करत असताना वेगाने येणाऱ्या एका दुचाकीच्या धडकेत ती जखमी झाली. जखमी अवस्थेत असलेल्या फामिदाला आधी अशोका रुग्णालयात आणि त्यानंतर नवनीत रुग्णालयात दाखल केलं. वेळेवर उपचार न मिळाल्याने संपूर्ण शरीरात विष पसरत असल्याने तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिचा उजवा पाय कापावा लागला.

Loading Comments