उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक ठेवलेली स्काॅर्पिओ कोणी पार्क केली होती याचा शोध आता लागला आहे. स्फोटक ठेवलेली स्काॅर्पिओ सचिन वाझे यांनी पार्क केली नसून ती त्यांच्या खासगी ड्रायव्हरने केली असल्याचं एनआयएच्या तपासात समोर आलं आहे.
मुकेश अंबानी यांच्या अॅन्टिलिया या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास सध्या एनआयकडून सुरू आहे. ही गाडी पार्क करण्यामागे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. एनआयएने सचिन वाझे यांच्यासह काही जणांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीतून रोज नवीन माहिती समोर येत आहेत.
या दिवशी सचिन वाझे पांढऱ्या रंगाची इनोव्हा चालवत होते, अशी माहिती आता एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. स्कॉर्पिओ पार्क करेपर्यंत इनोव्हा तिच्या मागे होती. १७ मार्च रोजी मनसुख हिरेन यांनी मुलूंड-ऐरोली रोडवर स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती. त्यानंतर त्याच दिवशी मनसुख हिरेन हे शहर पोलीस मुख्यालयात आले आणि त्यांनी ऑफिसमध्ये सचिन वाझे यांच्याकडे कारची चावी दिली, असं एनआयएचं म्हणणं आहे.
सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून त्यांचा खासगी ड्रायव्हर स्कॉर्पिओ उभी करण्यात आलेल्या मुलूंड-ऐरोली रस्त्यावर गेला. वाझेंच्या ड्रायव्हरने कार सोसायटीत आणली. त्यानंतर २४ फेब्रवारीपर्यंत कार तिथेच उभी होती. २५ फेब्रवारी रोजी ड्रायव्हर ती कार घेऊन दक्षिण मुंबईत गेला आणि अंबानींच्या घराजवळ कार पार्क केली.
ड्रायव्हर स्कॉर्पिओ घेऊन अँटिलियाच्या दिशेनं येत असताना पोलिसांनी गाडी अडवू नये म्हणून वाझे स्कॉर्पिओच्या मागेच होते. रात्री दहा वाजता ड्रायव्हरने अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली कार पार्क केली. त्यानंतर उतरून तो वाझे चालवत असलेल्या इनोव्हा गाडीत जाऊन बसला, अशी माहिती एनआयच्या तपासातून समोर आली आहे.
हेही वाचा -