छायाचित्रकाराची बॅग पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधली

शिवडीच्या बीपीसीएल परिसरात स्वतंत्र दिनादिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नियाज हे फोटो काढण्यासाठी आले होते. फोटो काढत असताना अचानक आलेल्या पावसामुळे पळापळ झाली. त्यावेळी नियाज पावसात कॅमेरा भिजू नये म्हणून त्यांच्या गाडीत येऊन बसले.

छायाचित्रकाराची बॅग पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधली
SHARES
मुंबईसह महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफरचा कॅमेरा चोरणाऱ्यास तिघांना शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. जलील शेख, मोहम्मद फरहान अली शेख, अरबाज अकबर घनसे अशी या आरोपींची नावे आहे. न्यायालयाने तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पावसामुळे पळापळ

 मुंबईत राहणारे नियाज बकरीदी मन्सूरी हे प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. मुख्यमंत्र्यासह अनेक राजकिय नेत्यांसाठी ते काम करतात.  शिवडीच्या बीपीसीएल परिसरात स्वतंत्र दिनादिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नियाज हे फोटो काढण्यासाठी आले होते. फोटो काढत असताना अचानक आलेल्या पावसामुळे एकच पळापळ झाली. त्यावेळी नियाज हे देखील पावसात कॅमेरा भिजू नये म्हणून त्यांच्या गाडीत येऊन बसले. मात्र  ते आपली बॅग कार्यक्रमाच्या ठिकाणी विसरले. त्यांच्या बॅगेत निकाॅनचा कॅमेरा आणि हजारो रूपयांच्या लेन्स होत्या. 


तीन दिवसांनी तक्रार 

पाऊस गेल्यानंतर नियाज पुन्हा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांना त्यांची बॅग सापडली नाही. सर्वत्र शोधले असता बॅग चोरीला गेले असल्याचा त्यांना संशय आला. मात्र तातडीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जायचे असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार न करता कार्यक्रमाच्या दिशेने धाव घेतली. नियाज यांनी शिवडी पोलिसात तीन दिवसांनी म्हणजेच १८ आॅगस्ट रोजी तक्रार नोंदवली.

सीसीटीव्हीत कैद

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोर्ट झोनच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक किरण मांढरे यांनी तपासाला सुरूवात केली. परिसरातील शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांना एका कॅमेऱ्यात तीन आरोपी  त्या कार्यक्रमाजवळ दिसून आले. हे तिघे काही तरी संशयास्पद वस्तू नेत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यापोलिस उपनिरीक्षक मांढरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीत यातील एक आरोपी रे रोड परिसरात राहत असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून पोलिस इतर दोन आरोपींपर्यंत पोहचले. या तिघांपैकी एका आरोपीच्या घरातून पोलिसांनी नियाज यांची चोरलेली कॅमेऱ्याची बॅग तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या तीन तासात हस्तगत केली.



हेही वाचा -

दुचाकी चोरणाऱ्या ४ सराईत आरोपींना अटक 

बीडीडी चाळीतील ५०० रहिवाशांंना एसीबीकडून चौकशीसाठी बोलावलं




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा