हॉटेलमध्ये तपासले बोर्डाचे पेपर?

 Mumbai
हॉटेलमध्ये तपासले बोर्डाचे पेपर?
Mumbai  -  

युवा सेनेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा बोर्डाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. या व्हिडिओमध्ये प्राध्यापक बोर्डाच्या उत्तरपत्रिका विलेपार्लेच्या एका हॉटेलमध्ये तपासताना दिसून येत आहे. एकीकडे दहिसर येथील शाळेतून बोर्डाच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. अशातच युवा सेनेने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओने बोर्डाची झोप उडाली आहे.

युवा सेनेने बोर्डाकडे याविषयी लेखी तक्रार केली आहे. युवा सेनेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती बोर्डाचे पेपर तपासत आहे. नेमक्या कोणत्या उत्तरपत्रिका ही व्यक्ती तपासत आहेत हे व्हिडिओतून स्पष्ट दिसत नाही. मात्र उत्तरपत्रिकांवर दिसणाऱ्या बारकोडमुळे हे पेपर बोर्डाचेच असल्याचा संशय बळावलाय. बोर्डाने या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी बोर्डाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याकडे केली आहे, असं युवासेनेच्या माजी सिनेट सदस्य निलिमा भुर्के म्हणाल्या.

या विषयी बोर्डाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले, युवा सेनेने सादर केलेले पुरावे पुरेसे नाहीयेत. युवा सेनेला या विषयी आणखी पुरावे सादर करायला सांगितले आहे. सबळ पुरावे मिळाल्यावरच योग्य ती कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

या व्हिडिओतील व्यक्ती जर 10 वी किंवा 12 वीचा पेपर तपासत असेल तर ते लांच्छनास्पद आहे. नेमका कोणता पेपर तपासतायत याची माहिती घेणं गरजेचं आहे. 10 वी किंवा 12 वीच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक ठिकाणी तपासण्याची परवानगी नाही. पण या प्रकरणात उत्तरपत्रिका तपासणारी व्यक्ती कोणत्या उत्तरपत्रिका तपासत आहे याचा उलगडा होत नाही. शिवाय अलीकडे ‘बारकोड’ हा ठराविक शिक्षण मंडळ किंवा विद्यापिठाचा मक्ता राहिलेला नाही. खासगी शिकवणी वर्गात सुद्धा हल्ली ‘बारकोड’ वापरतात. त्यामुळे सादर केलेला व्हिडिओ पुरेसा पुरावा आहे, असं वाटत नाही.

- डॉ. जयदीप निकम, संचालक, स्कूल ऑफ हेल्थ सायन्स, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

Loading Comments