
मुंबई शहर जिल्हयात गुरूवारी पोलिस विभागाच्या पथकाद्वारे शिवडी परिसरात १२ लाख रुपयांची संशयीत रक्कम पकडण्यात आली. याबाबत अधिक तपास सुरु आहे. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंदनशिवे आणि त्यांच्या पथकानं गस्तीदरम्यान एका वाहनाची तपासणी केली. त्यावेळी ही संशयीत रक्कम पोलिसांच्या हाती लागली.
वाहनात जुबेर समिउल्ला खान (२४), सय्यद शनबाज मोहम्मद शहा आलम (२५), युसुफ उस्मान शेख (३०) आणि अकबर सलिम पठाण (३१) होते. या इसमांपैकी जुबेर समिउल्ला खान असलेल्या बॅगेत त्यानं पैसे असल्याचे पोलिसांना सांगितलं. त्यानंतर त्यांना अधिक चौकशीसाठी शिवडी पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या बॅगेत १२ लाख १ हजार ५०० रूपये असल्याचे आढळून आलं.
याबाबत अधिक विचारणा केली असता सदर इसमाने ही रक्कम तो करीत असलेल्या धंद्यासाठी जमा केल्याचं सांगितलं. परंतु, सदरची रक्कम धंद्यासाठी कोणाकडून जमा केली याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असून आयकर विभागाचे उपायुक्त अधिक चौकशी करीत आहेत.
हेही वाचा -
दीड लाखांसाठी महेश भट्ट यांच्यावर गोळीबार, गँगस्टर रोडिओवालाची कबुली
मुंबईत डाॅन बनण्याचं स्वप्न पडलं महागात
