कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या डोक्यात आरोपीने फोडली बिअरची बाटली


कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या डोक्यात आरोपीने फोडली बिअरची बाटली
SHARES

मुंबईच्या देवनार परिसरात सराईत आरोपींवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस शिपायाच्या डोक्यास एका सराईत आरोपीने बिअरची बाटली फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत पोलिस शिपाई विनोद म्हात्रे (५०) हे गंभीर जखमी झाले होते. मात्र रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी आरोपींचा पाठलाग करून त्याच्या मुस्क्या आवळल्या, या प्रकरणातील इतर दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.

हेही वाचाः- मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली,  शहरातील सर्वाधिक खराब एक्यूआयची नोंद

देवनारच्या लाईफ लाइन हाँस्पिटल, गोवंडी येथे पोलिस शिपाई विनोद म्हात्रे हा रात्री सायकलने पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मागून आलेल्या दुचाकीहून तीन जण रात्रीच्या वेळेस भरधाव दुचाकी चालवून हातात नग्या तलवारी रस्त्यावर घासून टवाळखोरी करत होते. याची माहिती विनोद यांनी देवनार पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना देत सायकलने त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर देवनार पशु केंद्राच्या गल्लीत हे तीन आरोपी अंधारात उभे होते. त्यांच्या हातात तलवारी असल्याने विनोद यांनी त्यांना हटकले. हे तिघे रात्रीच्या वेळी रस्त्यावर येणा जाणाऱ्यांना लुटण्याच्या प्रयत्नात होते. विनोद यांनी हटकल्यानंतर यातील दोन आरोपींना पळ काढला. यातील सराईत आरोपी हसमत अली मुश्ताक शेख उर्फ मोहम्मद (१९) याला पकडण्यासाठी विनोद हे पुढे गेले असता. त्याने हातातील बिअरची बाटली विनोद यांच्या दिशेने भिरकावली. ती बाटली विनोद यांच्या डोक्यात फुटली. या दुर्घटनेत थोडक्यात विनोद यांचा डोळा वाचला.

हेही वाचाः- संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले, पण 'या' आहेत अटी

मात्र रक्तबंबाळ अवस्थेतही विनोद यांनी अलीचा पाठलाग करून स्थानिकांच्या मदतीने त्याला पकडले. तो पर्यंत देवनार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हसमत अली मुश्ताक शेख हा त्या परिसरातील सराईत आरोपी असून त्याच्यावर या पूर्वीही मारहाण,धमकी, आणि जिवे मारण्याचा प्रयत्न अशा दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याचे पळून गेलेले इतर दोन साथीदार लखन आणि फरहान उर्फ फोडी यांचा पोलिस शोध घेत आहेत. हसमतकडून पोलिसांनी ३० इंच लांबीची तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी देवनार पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा